मुलांना आर्थिक शिस्त लावण्यात आई सर्वांत महत्त्वाची भूमिका बजावत असते. पैसे नेमके कुठे खर्च करायला हवेत, ते कसे साठवावेत, हे ती मुलांना सांगत असते. वडिलांपेक्षा आई मुलांना अधिक पॉकेटमनी देत असल्याचेही समोर आले असून, त्या पॉकेटमनीचा योग्य वापर कसा करायचा, हे आई मुलांना शिकवते.
वडिलांपेक्षा आईच देते अधिक पॉकेटमनी
नुकत्याच समोर आलेल्या एका संशोधनानुसार, वडिलांपेक्षा आई मुलांना जास्त पॉकेटमनी देत असल्याचे समोर आले आहे. या अभ्यासात एक लाखाहून अधिक पालक सहभागी झाले आहेत. या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, मुलांना पॉकेटमनीच्या रूपात आईकडून सरासरी १५०० रुपये मिळतात, तर वडील १,१०० रुपये देतात.
या शहरांमध्ये पॉकेटमनी अधिक
पॉकेटमनी मिळविणाऱ्या मुलांपैकी ५० टक्के मुले पुणे, दिल्ली, कोलकाता, अहमदाबाद, बंगळुरू, चंडीगड आणि लखनौ येथील आहेत आणि त्यांचा पॉकेटमनी इतर शहरांतील मुलांपेक्षा जास्त असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे.
काय आहे सर्वेक्षणात?
मुलांना पैसा व्यवस्थापनाचे धडे शिकविण्यात आणि पैसे कसे खर्च केले जातात, याची समज विकसित करण्यात आई महत्त्वाची भूमिका बजावते. मातांनी आपल्या मुलांना मासिक बजेट तयार करणे, खर्च नियंत्रित करणे, बचत करणे आणि त्यांच्या सर्व व्यवहारांचा मागोवा ठेवणे यासारखी विविध पैसे व्यवस्थापन कौशल्ये शिकविली असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे.
मुले पॉकेटमनी कुठे वापरतात?
अभ्यासात असेही दिसून आले की, मुले त्यांच्या पॉकेटमनीचा वापर विशेषतः मोबाइल रिचार्ज, पेट्रोल भरणे, कॅब राइड, हॉटेलमध्ये जेवल्यानंतर बिल देणे यासारख्या गोष्टींसाठी खर्च करतात. याचवेळी ते ॲानलाइन वस्तू मागवण्यासाठीही खर्च करताना दिसून आले.
आई अशी लावते आर्थिक शिस्त...
मुलांना आर्थिक शिस्त शिकवण्यात आई महत्त्वाची भूमिका बजावते. मुलांना पैसे खर्च करण्याचा योग्य मार्ग शिकवणे आणि बचतीच्या सवयी लावणे हे पालक आपल्या मुलांना देऊ शकणाऱ्या सर्वोत्तम भेटींपैकी एक आहे. पालक आपल्या मुलांना लहान वयातच पैशाचे महत्त्व शिकवून त्यांना सक्षम करू शकतात.मुलांना आर्थिक शिस्त नेमकी कोण लावते?