नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्डच्या (SEBI) माजी सदस्या माधवी पुरी बुच यांची सेबीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भांडवली बाजार नियामकाची प्रमुख महिला होण्याची ही पहिलीच वेळ आहे. आता सेबीचे विद्यमान अध्यक्ष अजय त्यागी यांची जागा माधवी पुरी बुच घेणार आहेत. अजय त्यागी यांचा 5 वर्षांचा कार्यकाळ संपला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने माधवी पुरी बुच यांच्या निवडीला सुरुवातीच्या 3 वर्षांच्या कालावधीसाठी मान्यता दिली आहे. याआधी माधवी पुरी बुच यांनी शांघाय येथील न्यू डेव्हलपमेंट बँकेत काम केले. दरम्यान, माधवी पुरी बुच यांनी आपल्या करिअरची सुरुवात आयसीआयसीआय (ICICI) बँकेतून केली, त्यांनी फेब्रुवारी 2009 ते मे 2011 पर्यंत आयसीआयसीआय सिक्युरिटीजचे एमडी आणि सीईओ पदाचा कार्यभार सांभाळला.
आयआयएम अहमदाबादमधून एमबीएमाधबी पुरी बुच यांचे शालेय शिक्षण दिल्ली आणि मुंबई येथे झाले आहे. यानंतर त्यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून बॅचलर डिग्री केली. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद (IIM, Ahmedabad) येथून एमबीए केले आहे. करिअरच्या सुरुवातीला आयसीआयसीआय बँकेत काम केल्यानंतर त्यांनी UK मध्येही शिक्षण घेतले आहे. 2011 मध्ये माधवी पुरी बुच सिंगापूरला गेल्या. त्याठिकाणी त्यांनी ग्रेटर पॅसिफिक कॅपिटल एलएलपीमध्ये सामील झाल्या होत्या.
6 डिसेंबर होती अंतिम तारीख दरम्यान, सेबीला नवा अध्यक्ष मिळणार की विद्यमान प्रमुख अजय त्यागी यांना सेवा मुदतवाढ दिली जाणार, याची प्रतीक्षा शेअर बाजाराकडून होत होती. ऑक्टोबरमध्ये अर्थ मंत्रालयाने सेबीच्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीसाठी अर्ज मागवले होते. त्यासाठी 6 डिसेंबर ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. 22 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलेल्या माहितीत असे म्हटले होते की, शॉर्टलिस्टिंगची प्रक्रिया सध्या सुरू आहे. तसेच, नियामकांच्या नियुक्तीच्या प्रक्रियेनुसार, अर्जदारांना आर्थिक क्षेत्र नियामक नियुक्ती शोध समितीद्वारे शॉर्टलिस्ट केले जाते. या समितीचे अध्यक्ष वित्त सचिव असतात.