Join us  

Manoj Modi: कोण आहेत मनोज मोदी? ज्यांना  मुकेश अंबानी यांनी गिफ्ट दिलंय १५०० कोटींचं घर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 2:03 PM

Manoj Modi: मनोज मोदी हे सध्या मुकेश अंबानी यांनी दिलेल्या एका गिफ्टमुळे चर्चेत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार मनोज मोदी यांना अंबानी यांनी एक २२ मजली इमारत भेट दिली आहे. या इमारतीची किंमत १५०० कोटी रुपये एवढी आहे.  

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्सचे मालक मुकेश अंबानी यांचा उद्योग क्षेत्रात दबदबा आहे. मुकेश अंबानी त्यांच्या व्यवसायाचा वेगवेगळ्या क्षेत्रात विस्तार करत आहेत. मात्र अंबानी यांच्या या व्यवहारांमागे एका खास व्यक्तीचा मेंदू आहे. हल्लीच मुकेश अंबानी यांनी त्यांना तब्बल १५०० कोटी रुपयांचं घर भेट दिल्याने ते चर्चेत आले आहेत. त्यांचं नाव आहे मनोज मोदी. मुकेश अंबानी यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे मनोज मोदी हे त्यांचे बालपणीचे मित्र आहेत. मुकेश अंबानी आणि मनोज मोदी हे मुंबई विद्यापीठातील डिपार्टमेंट ऑफ केमिकल इंजिनिअरिंगच्या वर्गात होते. दोघांचीही रिलायन्समधील एंट्रीही एकाच काळात झाली. गुजराती कुटुंबात जन्मलेल्या मनोज मोदी यांच्या कुटुंबामध्ये पत्नी आणि दोन मुली आहेत. मात्र त्यांच्याबाबत फार माहिती उपलब्ध नाही.

मनोज मोदी यांना रिलायन्समध्ये एमएम नावाने ओळखले जाते. त्यांनी रिलायन्समध्ये धीरुभाई अंबानी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर मुकेश अंबानी आणि त्यांची मुले ईशा-आकाश आणि अनंत अंबानी यांच्यासोबतही ते काम करत आहेत. याचाच अर्थ मनोज मोदी यांनी अंबानी कुटुंबातील तिन्ही कुटुंबांसोबत काम केलं आहे. अंबानींचे निकटवर्तीय असूनही त्यांचं नाव फारच कमी लोकांनी ऐकलेलं आहे. याचं कारण म्हणजे मनोज मोदी हे लाइमलाइटपासून लांब राहणे पसंत करतात. तसेच ते सोशल मीडियावरही सक्रिकय नाहीत.

अंबानींचे राईट हँड मानले जाणारे मनोज मोदी हे रिलायन्स ग्रुपमधील सर्वात शक्तिशाली लोकांपैकी एक आहेत. तसेच कंपनीत आणि बाहेरही ते मुकेश अंबानी यांच्यासोबत असतात. सध्या ते रिलायन्स रिटेल आणि रिलायन्स जियोमध्ये डायरेक्टर पदावर आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे १९८० मध्ये रिलायन्सशी जोडले गेल्यापासून ते कुठल्याही पदाविना ते अंबानींसोबत राहिले. २००७ मध्ये त्यांनी कंपनीचे डायरेक्टर म्हणून पदभार सांभाळला. मुकेश अंबानी यांना बिझनेसबाबत कुठला मोठा निर्णय घ्यायचा असेल तर ते मनोज मोदींवरच अधिक विश्वास ठेवतात.

एप्रिल २०२० मध्ये फेसबूकसोबत रिलायन्स जियोच्या बिग डीलमध्येही मनोज मोदी यांनी पुढाकार घेतला होता. या ४३ हजार कोटी रुपयांच्या डीलने रिलायन्सला कर्जमुक्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. याशिवाय रिलायन्सच्या इतर अन्य मोठ्या प्रोजेक्टमध्येही त्यांची भूमिका होती. दरम्यान मनोज मोदी हे सध्या मुकेश अंबानी यांनी दिलेल्या एका गिफ्टमुळे चर्चेत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार मनोज मोदी यांना अंबानी यांनी एक २२ मजली इमारत भेट दिली आहे. या इमारतीची किंमत १५०० कोटी रुपये एवढी आहे.  

टॅग्स :रिलायन्समुकेश अंबानीव्यवसाय