नवी दिल्ली - यूनिफाईल पेमेंट इंटरफेस अर्थात यूपीआय पेमेंटमध्ये भारताने पुन्हा एकदा मोठी झेप घेतली आहे. २०२३-२४ यूपीआयद्वारे व्यवहारांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल ५६ टक्के तर मूल्याच्या बाबतीत ४३ टक्के वाढ झाली आहे.
यूपीआयद्वारे झालेल्या व्यवहारांनी पहिल्यांदाच १३१ अब्जांचा उच्चांक गाठला आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात यूपीआयद्वारे एकूण ८४ अब्ज व्यवहार झाले होते. मार्च २०२४ मध्ये देखील मागील वर्षीच्या तुलनेत यूपीआय व्यवहार ५५ टक्क्यांनी वाढून १३.४४ अब्जांवर पोहोचले. तर एकूण व्यवहारांचे मूल्य ४० टक्क्यांनी वाढून १९.७८ लाख कोटींवर पोहोचले.
आधार पेमेंटमध्ये मात्र घट
आधार सक्षम पेमेंट सिस्टमने (एईपीएस) मार्च २०२४ मध्ये एक टक्क्यांनी घट झाली आहे. याद्वारे एकूण १०.८ कोटी व्यवहार झाले ज्यांचे मूल्य २७,९९६ कोटी रुपये इतके होते. व्यवहार मूल्यातही ८ टक्के घट झाली.
मार्च २०२४ मध्ये झालेली वाढ
पद्धत एकूण व्यवहार वाढ व्यवहारांचे मूल्य वाढ
यूपीआय १३.४४ अब्ज ५५% १९.७८ लाख कोटी ४०%
आयएमपीएस ५९९.९ कोटी ९% ६४.९३ लाख कोटी १७%
फास्टॅग ३३.९ कोटी ११% ५,९३९ कोटी १७%
आयएमपीएसने पाठवले ६४.९३ लाख कोटी
मार्च २०२४ मध्ये तात्काळ पेमेंट सेवेद्वारे (आयएमपीएस) व्यवहार १७ टक्क्यांनी वाढून ५८१ दशलक्षांपर्यंत पोहोचले आहेत. मूल्याच्या बाबतीत १६ टक्के वाढून ६.३५ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. संपूर्ण वर्षात हे व्यवहार ९ टक्के वाढून ५९९ कोटींच्या घरात पोहोचले. २०२२-२३ या वर्षात हे प्रमाण ५५१ कोटी इतके होते.
मूल्याच्या बाबतीत आयएमपीएस व्यवहार १७ टक्क्यांनी वाढून ६४.९३ लाख कोटी रुपये झाले. हे प्रमाण एका वर्षापूर्वी ५५.४२ लाख कोटी रुपये होते. फेब्रुवारीत५३.५ कोटी व्यवहार झाले ज्यांचे मूल्य ५.६८ लाख कोटी इतके होते.
लहान व्यवहारांच्या संख्येत वाढ
- वर्ल्डलाइन इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रोंगाला म्हणाले की, ‘आर्थिक वर्ष २०२४ मध्ये यूपीआयद्वारे व्यवहारांमध्ये जोरदार वाढ झाली आहे. जसजसा यूपीआयमध्ये अधिकाधिक लोकांचा प्रवेश वाढला आहे, तसतसे सरासरी व्यवहारांचे मूल्य कमी होत गेले आहे.
- लहान व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मार्च २०२४ मध्ये झालेले व्यवहार सरासरी १,४७१ रुपयांचे होते तर मार्च २०२३ मध्ये व्यवहारांचा सरासरी आकार १,६२३ रुपये इतका होता.
फास्टॅगने ३३.९ कोटी व्यवहार
फास्टॅगद्वारे झालेले व्यवहार ११ टक्क्यांनी वाढून ३३.९ कोटींवर पोहोचले. मूल्यांच्या बाबतीत हे व्यवहार १७ टक्क्यांनी वाढून ५,९३९ कोटी रुपयांच्या घरात पोहोचले. फेब्रुवारी २०२४ मध्ये ३२.३ कोटी फास्टॅग व्यवहार झाले. यांचे मूल्य ५,५८२ कोटी रुपये इतके होते.