Elon Musk : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांची इलेक्ट्रिक वाहन निर्मिती कंपनी टेस्ला भारतात येण्यासाठी उत्सुक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच अमेरिका दौऱ्यावर टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क यांना भेटले. तेव्हापासून टेस्ला लवकरच भारतात येण्याचे संकते मिळाले आहे. इतकेच नाही तर टेस्लाने मुंबई आणि दिल्लीमध्ये नोकरभरतीसाठी जाहिरातही प्रसिद्ध केली आहे. भारतात टेस्लाचे आणण्यासाठी मस्क अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. त्यांचे हे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार असल्याचे दिसत आहे. दरम्यान, मस्क यांचे स्वप्न पूर्ण करण्यात एका भारतीय व्यक्तीचा मोठा हात आहे. प्रशांत मेनन असं या भारतीयाचं नाव असून गेल्या ३-४ वर्षांपासून ते या योजनेवर काम करत आहेत.
प्रशांत यांची २०२१ मध्ये टेस्ला इंडियाचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. तेव्हाही टेस्लाचा भारतात येण्याचा मार्ग जवळपास मोकळा होता. पण, टेस्लाच्या काही मागण्या भारत सरकारने पूर्णपणे नाकारल्याने टेस्लाचे भारतात येण्याचे स्वप्न थांबले. यानंतर टेस्लाला भारतातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष गरज उरली नाही. कंपनीने प्रशांत यांना नेदरलँडमध्ये कामकाज हाताळण्यासाठी पाठवले. मात्र, आता ते पुन्हा एकदा भारतात परतले आहेत.
मस्क यांच्याशी जवळचे संबंध
भारतातील टेस्लाचे संचालक बनण्यापूर्वी प्रशांत मेनन अमेरिकेत टेस्लासोबत काम करत होते. ते कंपनीचे यूएसमधील खर्च, प्रक्रिया आणि नियामक मंडळाचे संचालक होते. मात्र, त्याआधीपासून त्यांची मैत्री आहे. दोघांनीही पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या व्हार्टन स्कूल ऑफ बिझनेसमधून शिक्षण घेतले आहे. प्रशांतच्या Linkedin प्रोफाइलनुसार, ते २०१६ पासून टेस्लासोबत आहे. याआधी, २०१५ ते नोव्हेंबर २०१६ पर्यंत ते अर्न्स्ट अँड यंग या सल्लागार कंपनीचे प्रादेशिक संचालक होते.
मुंबई विद्यापीठातून शिक्षण
प्रशांत यांनी मुंबई विद्यापीठातून बॅचलर ऑफ कॉमर्स, बिझनेस आणि इकॉनॉमिक्समध्ये पदवी संपादन केली आहे. यानंतर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाची परीक्षा उत्तीर्ण होऊन ते सीए झाले. सीए केल्यानंतर, ते व्हार्टन स्कूलमध्ये गेले. जेथे मस्क यांनी देखील शिक्षण घेतलं आहे.