नवी दिल्ली - रिलायन्स इंडस्ट्रीजने आज वृत्तपत्रांमध्ये एक जाहिरात दिली आहे. यामध्ये कंपनीचे संस्थापक रसिकभाई एल मेसवानी (Rasikbhai L Meswani) यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. रसिकभाई मेसवानी यांनी रिलायन्सच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. रिलायन्सचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांची मोठी बहीण त्रिलोचना बेन यांचे ते पुत्र होते. त्यांचा जन्म 24 ऑक्टोबर 1938 रोजी झाला आणि 30 ऑगस्ट 1985 रोजी त्यांचे निधन झाले. रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे ते पहिले बॉस होते. मुकेश अंबानी सुरुवातीला त्यांना रोज रिपोर्ट करायचे. हे त्यांनी स्वतः एका मुलाखतीत सांगितले.
मुकेश अंबानी यांनी रसिकभाई मेसवानी हे त्यांचे पहिले बॉस असल्याचं म्हटलं होतं. ते म्हणाले होते, "1981 मध्ये रसिकभाई मेसवानी माझे पहिले बॉस होते. त्या काळात मॅनेजमेंटची स्टाईल ओपण असायची. आम्ही एकमेकांच्या केबिनमध्ये जाऊ शकत होतो, कोणत्याही चर्चेत सहभागी होऊ शकत होतो. पण जेव्हा मी औपचारिकपणे रिलायन्समध्ये सामील झालो तेव्हा वडील म्हणाले की, तुम्हाला बॉसची गरज आहे. असे रसिकभाई माझे बॉस झाले. ते आमचा पॉलिस्टरचा व्यवसाय पाहायचे."
रसिकभाईंची मुलं निखिल आर मेसवानी आणि हितल आर मेसवानी हे रिलायन्समध्ये कार्यकारी संचालक आहेत. हे दोन्ही भाऊ मुकेश अंबानी यांचे उजवे हात मानले जातात. निखिल 1986 मध्ये रिलायन्समध्ये रुजू झाले आणि 1 जुलै 1988 पासून कंपनीत पूर्णवेळ संचालक आहे. निखिल यांचे धाकटे भाऊ हितल हे देखील 4 ऑगस्ट 1995 पासून रिलायन्समध्ये संचालक आहे. निखिल रिलायन्सचा पेट्रोकेमिकल विभाग पाहतात. दुसरीकडे, हितल पेट्रोलियम रिफाइनिंग आणि मार्केटिंग व्यवसाय, पेट्रोकेमिकल्स उत्पादन आणि इतर कामं पाहतात.
रसिकभाईंचे 1985 मध्ये निधन झाले. पुढच्याच वर्षी धीरूभाई अंबानींना स्ट्रोक आला. अशा परिस्थितीत मुकेश अंबानी यांना लहान वयातच मोठी जबाबदारी घ्यावी लागली. मुकेश अंबानी यांना वयाच्या 24 व्या वर्षी पाताळगंगा पेट्रोकेमिकल प्लांट बांधण्याची जबाबदारी देण्यात आली होती. धीरूभाई अंबानी यांचे 2002 मध्ये निधन झाले. मुकेश अंबानी आणि त्यांचे धाकटे भाऊ अनिल अंबानी यांच्यात मालमत्तेवरून तणाव वाढला होता. अखेर त्यांची आई कोकिलाबेन अंबानी यांच्या मध्यस्थीनंतर रिलायन्सचा व्यवसाय दोन भागात विभागला गेला. आज मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज ही मोठी कंपनी आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.