Join us  

बँकेतील लॉकरमध्ये ठेवलेले पैसे खराब झाले तर परत मिळतात का? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 12:38 PM

पीएनबी बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या पैशांना वाळवी लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पीएनबी बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या पैशांना वाळवी लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानच्या उदयपूरमधील पीएनबी बँकेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.या लॉकरमध्ये लाखो रुपये ठेवल्याचे समोर आले होते, आता या पैशांची भरपाई बँक करणीर की नाही अशी चर्चा सुरू आहे. ही जबाबदारी नेमकी कोणाची असते अशी चर्चा सुरू आहे, चला जाणून घेऊ नियम काय सांगतो. 

1 फेब्रुवारी 2023 पासून देशात नवीन लॉकर नियम लागू झाले आहेत. या नियमांमध्ये ग्राहकांच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंची सुरक्षा अधिक मजबूत करण्यात आली आहे. हे नवीन नियम ग्राहकांसाठी खूप फायदेशीर आहेत. आरबीआयने बँकांना 1 जानेवारीपासून विद्यमान लॉकर ग्राहकांसोबत लॉकर कराराचे नूतनीकरण करण्यास सांगितले होते. ''बँकांनी त्यांच्या लॉकर करारामध्ये कोणत्याही अयोग्य अटी किंवा शर्ती नाहीत याची खात्री करावी. तसेच, लॉकर करार खूप कठीण नसावा, असं आरबीआयने म्हटले आहे. 

बँकेच्या निष्काळजीपणामुळे लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंचे काही नुकसान झाल्यास बँकेला त्याची भरपाई द्यावी लागेल. आरबीआयच्या नवीन नियमांमध्ये ही तरतूद ठेवण्यात आली आहे. आरबीआयच्या नवीन नियमांनुसार लॉकर आणि बँक परिसर यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती पावले उचलण्याची जबाबदारी बँकांची आहे. आग, चोरी, दरोडा किंवा इमारत कोसळणे यासारख्या घटना स्वतःच्या निष्काळजीपणामुळे किंवा चुकांमुळे घडू नयेत याची बँक खात्री करेल.

आरबीआयच्या नवीन नियमांनुसार, लॉकरमधील ऐवजाचे नुकसान झाल्यास बँकांना जबाबदारी घ्यावी लागेल. 

बँकेच्या निष्काळजीपणामुळे लॉकरमधील ऐवज खराब झाल्यास बँकेला नुकसान भरपाई द्यावी लागेल. बँकेच्या कर्मचाऱ्याच्या फसवणुकीमुळे नुकसान झाले तरी भरपाई द्यावी लागेल. ही भरपाई लॉकरच्या वार्षिक भाड्याच्या 100 पट असेल.

भूकंप, वीज, वादळ किंवा पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तींमुळे लॉकरमधील सामग्रीचे नुकसान झाल्यास बँक जबाबदार राहणार नाही. ग्राहकांच्या चुकांमुळे किंवा निष्काळजीपणामुळे लॉकरमधील ऐवजाचे कोणतेही नुकसान झाल्यास बँक जबाबदार राहणार नाही, अशा आपत्तींपासून बचाव करण्यासाठी बँकांना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पीएनबीचे लॉकर खोलताच किंचाळली तरुणी; लाखो रुपयांची हालत अशी की, मातीच झाली....

उदयपूरच्या पीएनबी शाखेत लॉकरमध्ये ठेवलेल्या नोटांना वाळवी लागल्याच्या घटनेनंतर शाखेच्या इतर लॉकरमध्येही वाळवी लागली असण्याची शक्यता आहे, असे झाल्यास बँकेचा निष्काळजीपणा समोर येईल. अशा स्थितीत बँकेला नुकसान भरपाई द्यावी लागू शकते. बँकेच्या व्यवस्थापकाचे म्हणणे आहे की त्यांनी या घटनेची माहिती अधिकाऱ्यांना दिली आहे. 

टॅग्स :बँकव्यवसाय