Who Is Roshani Nadar: रोशनी नाडर हे नाव तुम्ही कदाचित यापूर्वी ऐकलं असेल. पण जर तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती नसेल तर आज आपण त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न करू. रोशनी नाडर या एचसीएल टेक्नॉलॉजीजचे (HCL Tech) संस्थापक शिव नाडर (Shiv Nadar) यांच्या कन्या आहेत. त्या रातोरात भारतातीलच नव्हे तर आशियातील सर्वात श्रीमंत बिझनेसवुमन बनल्यात. वडिलांमुळे त्यांनी हे यश मिळवलंय. शिव नाडर यांनी आपला ४७ टक्के हिस्सा आपली मुलगी रोशनी नाडर मल्होत्रा यांना भेट म्हणून दिलाय. वडिलांकडून भेट म्हणून कंपनीचा मोठा हिस्सा मिळाल्यानंतर रोशनी नाडर यांची नेटवर्थ किती झाली आहे, हे जाणून घेऊ.
आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती
ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या आकडेवारीनुसार, रोशनी नाडर मल्होत्रा यांना एचसीएल समूहाचे संस्थापक शिव नाडर यांच्याकडून नुकतीच ४७ टक्के हिस्सेदारी खरेदी करून कंपनीतील सर्वात मोठी भागधारक बनल्या. इतकंच नाही तर, त्या भारतातील तिसऱ्या सर्वात श्रीमंत भारतीय बनल्या आहेत. याशिवाय त्या भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत बिझनेसवुमन बनल्यात. ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार रोशनी जगातील पाचव्या क्रमांकाच्या श्रीमंत महिला ठरल्या आहेत. वडिलांकडून कंपन्यांचा मोठा हिस्सा विकत घेऊन जगातील अब्जाधीशांच्या जगात प्रवेश करणे ही रोशनी नाडर यांच्यासाठी मोठी गोष्ट आहे.
सर्वात मोठ्या भागधारक
एचसीएल टेकचे संस्थापक शिव नाडर यांनी एचसीएल कॉर्पोरेशन आणि वामा दिल्ली सारख्या प्रवर्तक संस्थांमधील आपला ४७ टक्के हिस्सा आपल्या मुलीला भेट म्हणून दिला आहे. गिफ्ट डीड ट्रान्सफर पूर्ण झाल्यानंतर त्या एचसीएल कॉर्प आणि वामावर बहुसंख्य नियंत्रण मिळवतील. यामुळे एचसीएल इन्फोसिस्टम्स आणि एचसीएल टेकमधील सर्वात मोठा भागधारक होईल. सध्या रोशनी नाडर यांची दोन्ही कंपन्यांमध्ये एकूण ५७ टक्क्यांहून अधिक हिस्सा आहे.
एचसीएल कॉर्पकडे ४९.९४ टक्के हिस्सा
याशिवाय रोशनी नाडर मल्होत्रा यांना एचसीएल इन्फोसिस्टम्समधील वामा दिल्लीच्या १२.९४ टक्के आणि एचसीएल कॉर्पमधील ४९.९४ टक्के हिस्स्यावरील मतदानाचा अधिकार मिळणार आहे. सध्या एचसीएलटेकमध्ये वामा सुंदरी इन्व्हेस्टमेंटची ४४.७१ टक्के हिस्सेदारी असून, त्याचे मूल्य १,८६,७८२ कोटी रुपये आहे. २०२० पासून एचसीएलटेकच्या चेअरमन असलेल्या रोशनी नाडर मल्होत्रा यांनी आपल्या वडिलांकडून हे पद स्वीकारलं. रोशनी यांनी नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीमधून कम्युनिकेशनमध्ये बॅचलर डिग्री आणि केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीए केलं आहे.
अझीम प्रेमजी मागे
विशेष म्हणजे रोशनी नाडर यांनी होल्डिंग व्हॅल्यूच्या बाबतीत विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी यांना मागे टाकलं आहे. रोशनी नाडर यांचा मूल्यानुसार कंपनीत सर्वात मोठा हिस्सा आहे. रिपोर्टनुसार, रोशनी यांची एचसीएल टेकमध्ये २.५७ लाख रुपयांहून अधिक किंमतीचा हिस्सा आहे. विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी यांची होल्डिंग कंपनीत सुमारे २.१९ लाख कोटी रुपयांची हिस्सेदारी आहे. माइंडट्रीमध्ये एल अँड टीचा ९५,००० कोटी रुपयांहून अधिक हिस्सा आहे. इन्फोसिसचा खासगी कंपन्यांमध्ये ९१ हजार कोटी रुपयांहून अधिक हिस्सा आहे. टेक महिंद्रामध्ये महिंद्राचा ५१ हजार कोटी रुपयांहून अधिक हिस्सा आहे.