Who is Sagar Adani : अमेरिकेत अदानी समूहावर आरोप केल्यानंतर एका नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. ते नाव आहे गौतम अदानी (Gautam Adani) यांचे पुतणे सागर अदानी (Sagar Adani) यांचं. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या अदानी आणि इतर सात आरोपींवर फसवणुकीचे अनेक आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यात सागर अदानींचाही समावेश आहे. गौतम अदानी यांच्यासह या सात जणांनी प्रोजेक्ट मिळवण्यासाठी सुमारे २६५ मिलियन डॉलर्सची लाच दिल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. अदानी समूहाने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.
कोण आहेत सागर अदानी?
सागर अदानी हा गौतम अदानी यांचे बंधू राजेश अदानी यांचे सुपुत्र आहेत. ते अदानी समूहाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. त्यांनी अमेरिकेतील ब्राऊन विद्यापीठातून अर्थशास्त्राची पदवी घेतली आहे. सागर २०१५ मध्ये अदानी समूहात रुजू झाले. ते समूहाचा एनर्जी व्यवसाय आणि फायनान्स विभाग सांभाळतात. त्यांनी अदानी ग्रीन एनर्जीचा सोलर आणि विंड पोर्टफोलिओ सुरू केला. रिन्यूएबल एनर्जीवरही त्यांचा भर आहे.
मागच्या वर्षी सर्च वॉरंट
एफबीआयच्या विशेष एजंट्सनं मार्च २०२३ मध्ये सागर अदानी यांच्या विरोधात सर्च वॉरंट जारी केले होते. त्यांना ग्रँड ज्युरी समन्सही बजावण्यात आलं होतं. अमेरिकेच्या डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या आदेशात असं म्हटलं आहे.
काय आहेत आरोप?
भारतात सोलर एनर्जीचं कंत्राट मिळवण्यासाठी अदानी समूहानं सुमारे २१०० कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप अमेरिकेतील वकिलांनी केला आहे. न्यूयॉर्कमधील ब्रुकलिन मध्ये दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात गौतम अदानी, सागर अदानी आणि विनिता जैन यांचीही नावं आहेत.
आरोपांचं खंडन
आरोपांनंतर अदानी समूहाकडून एक निवेदन जारी करण्यात आलंय. अदानी ग्रीनच्या संचालकांवर अमेरिकेचे न्याय विभाग आणि यूएस सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनने केलेले आरोप निराधार असल्याचं समूहाच्या प्रवक्त्यानं सांगितलं.