Shapoorji Pallonji Group : देशाच्या उभारणीत अनेक उद्योगपतींचा मोठा हातभार लागला आहे. टाटा आणि बिर्ला यांच्यासह देशात अनेक औद्योगिक घराणे आहेत, ज्यांचा इतिहास १०० वर्षांपेक्षा जुना आहे. त्यापैकी एक म्हणजे शापूरजी पालोन जी बिझनेस ग्रुप. टाटा समूहाच्या समकालीन या औद्योगिक घराण्याला १५० वर्षांचा इतिहास आहे. शापूरजी पालोन जी अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड हा १५ प्रमुख कंपन्यांचा जागतिक आणि वैविध्यपूर्ण व्यवसाय समूह आहे. १८६५ साली मुंबईत या ग्रुपची स्थापना झाली होती. या समूहाचा व्यवसाय जगभरातील ४० देशांमध्ये पसरला असून ३५ हजारांपेक्षा जास्त कर्मचारी यात काम करतात.
शापूर जी पालोन जी ग्रुपचा इतिहासशापूरजी पालोनजी ग्रुपची मुहूर्तमेढ पालोनजी मिस्त्री (दिवंगत सायरस मिस्त्री यांचे पणजोबा) यांनी १८६५ मध्ये लिटलवुड पालोनजी अँड कंपनी म्हणून रोवली. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, २०२२ मध्ये या व्यवसाय समूहाची एकूण संपत्ती सुमारे ३० अब्ज डॉलर इतकी आहे. दिवंगत सायरस मिस्त्री यांचे मोठे बंधू शापूर जी मिस्त्री यांच्याकडे या ग्रुपचे नेतृत्व आहे. डिसेंबर २०१२ मध्ये टाटा समूहाची कमान हाती घेतल्यानंतर सायरस मिस्त्री यांनी या समूहाची जबाबदारी शापूर जी मिस्त्री यांच्याकडे सोपवली होती. शापूर आणि सायरस मिस्त्री यांचे वडील पालोनजी मिस्त्री यांना ‘फँटम ऑफ बॉम्बे हाऊस’ म्हणून ओळखले जात असे.
कुठल्या क्षेत्रात व्यवसाय?शापूरजी पालोनजी अँड कंपनी विशेषतः इंजिनिअरिंग कामासाठी ओळखली जाते. ही Afcons ब्रँड अंतर्गत देशातील सर्वात जुनी देशांतर्गत अभियांत्रिकी आणि बांधकाम कंपनी आहे. या समूहाने केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण आशियामध्ये आलिशान हॉटेल्स, स्टेडियम, इमारती आणि कारखाने बांधले आहेत. शापूरजी पालोनजी ग्रुपने देशातील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज टॉवर्स, मुंबईतील ओबेरॉय हॉटेल तसेच ओमानच्या सुलतानसाठी निळा आणि सोनेरी अल आलम पॅलेस बांधला आहे. याशिवाय दुबईतील जुमेराह लेक टॉवर्स आणि मॉरिशसमधील अबेने सायबर सिटी देखील शापूर जी पालोन जी ग्रुपने बांधली आहे.
याव्यतिरिक्त शापूरजी पालोनजी अँड कंपनीचा व्यवसाय बांधकाम, रिअल इस्टेट, वीज, कापड, अभियांत्रिकी वस्तू, शिपिंग आणि प्रकाशन अशा अनेक क्षेत्रात पसरलेला आहे. पण समूहाचा सर्वात मोठा आणि ऐतिहासिक व्यवसाय म्हणजे बांधकाम.