नवी दिल्ली: भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी गव्हर्नर असताना त्यांच्या पगाराचा खुलासा केला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असताना त्यांना ४ लाख रुपये पगार मिळत होता, अशी माहिती रघुराम राजन यांनी दिली. तसेच आरबीआय गव्हर्नरला इतर भत्ते मिळत नाहीत, जे सरकारी अधिकाऱ्यांना मिळतात. पेन्शनही मिळत नाही, असे रघुराम राजन यांनी सांगितले.
रघुराम राजन यांनी त्यांच्या दृष्टीकोनातून आतापर्यंतच्या सर्वोत्तम अर्थमंत्र्यांची नावेही सांगितले. आतापर्यंतचे सर्वोत्तम अर्थमंत्री माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि यशवंत सिन्हा आहेत, असं रघुराम राज म्हणाले. एनडीए सरकारमध्ये यशवंत सिन्हा दोन वेळा अर्थमंत्री झाले होते. रघुराम राजन म्हणाले की, पी. चिदंबरम यांनीही अर्थमंत्री म्हणून चांगले काम केले आहे. राज शमानी यांच्या "फिगरिंग आउट" पॉडकास्टवर रघुराम राजन बोलत होते.
यामागचे कारण सांगताना रघुराम राजन म्हणाले की, डॉ. मनमोहन सिंग यांनी ९०च्या दशकाच्या सुरुवातीला मोठे उदारीकरण केले होते. हा एक मोठा बदल होता, ज्यामुळे देशाच्या विकासाचा वेग वाढला. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव होते. ते म्हणाले की, नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांनी विकासाची गती वाढवली. यशवंत सिन्हा यांच्याबाबत ते म्हणाले की, त्यांना मनमोहन सिंग यांच्यासारखे राजकीय पाठबळ मिळाले नाही, पण तरीही सिन्हा यांनी व्याजदर कमी करणे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला निधी देण्यास मदत करणे, पेट्रोलियम उद्योग नियंत्रणमुक्त करणे अशा अनेक मोठ्या सुधारणा केल्या.