नवी दिल्ली : फोर्ब्स नियतकालिकाने जारी केलेल्या जगातील १०० शक्तिशाली महिलांच्या यादीत भारतातील ४ महिलांचा समावेश झाला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग पाचव्यांदा या यादीत स्थान प्राप्त आहे.
सीतारामन यांच्याव्यतिरिक्त एचसीएलच्या सीईओ रोशनी नाडर मल्होत्रा, स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या अध्यक्ष सोमा मंडल आणि बायोकॉनच्या संस्थापक किरण मुजुमदार-शॉ या तिघींचा फोर्ब्सच्या या यादीत समावेश करण्यात आला आहे.
२०२२ मध्ये सीतारामन यांनी ३६ वे स्थान पटकावले होते. यंदा त्यांनी चार पायऱ्यांची प्रगती केली आहे. २०२१ मध्ये त्या ३७ व्या स्थानावर होत्या. त्या २०१९मध्ये अर्थमंत्री बनल्या.
फाेर्ब्सच्या यादीत पहिल्या स्थानी काेणती महिला?फोर्ब्सच्या १०० शक्तिशाली महिलांच्या यादीत पहिल्या चार महिला राजकीय पार्श्वभूमी असलेल्या आहेत. युरोपीय आयोगाच्या प्रमुख उर्सुला वॉन डेर लेयेन या पहिल्या स्थानी असून, यूरोपीय केंद्रीय बँकेच्या प्रमुख क्रिस्टीन लेगार्ड दुसऱ्या, अमेरिकी उपराष्ट्रपती कमला हॅरिस तिसऱ्या आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी चौथ्या स्थानावर आहेत. पाचव्या स्थानावर ब्रिटिश गायिका टेलर स्विफ्ट यांची वर्णी लागली आहे.
३२ वे स्थान निर्मला सीतारामन यांनी यादीत पटकावले आहे. ६० वे स्थान रोशनी नाडर मल्होत्रा यांना मिळाले आहे. ७० वे स्थान सोमा मंडल यांना मिळाले आहे. ७६ वे स्थान किरण मुजुमदार-शॉ यांना मिळाले आहे.