फूड अँड बेवरेज इंडस्ट्रीतील दिग्गज कंपन्यांपैकी एक असलेल्या पेप्सिको इंडियाच्या सीईओपदी जागृत कोटेचा (Jagrut Kotecha) यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. कंपनीने शुक्रवारी यासंदर्भातील निवेदन जारी केलं आहे. नेतृत्व बदलाचा एक भाग म्हणून, पेप्सिकोनं सांगितलं की जागृत कोटेचा हे सीईओ म्हणून भारतीय व्यवसायाचं नेतृत्व करतील, तर अहमद अल शेख पश्चिम आशियातील व्यवसाय युनिटची जबाबदारी सांभाळतील. कंपनीनं जारी केलेल्या निवेदनानुसार, कोटेचा, आफ्रिका, मध्य पूर्व आणि दक्षिण आशियासाठी (AMESA) पेप्सिको इंडियाचे सीईओ म्हणून भूमिका स्वीकारतील. यापूर्वी अहमद अल शेख यांच्याकडे ही जबाबदारी होती.
यामुळे केलाय बदल
पेप्सिकोचे मुख्य कार्यकारी अधिकारी (आफ्रिका, पश्चिम आशिया आणि दक्षिण आशिया) यूजीन विलेमसेन म्हणाले की, भारत ही कंपनीसाठी एक महत्त्वाची बाजारपेठ आहे, जी आमच्या जागतिक धोरणात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. गेल्या सहा वर्षात अहमद यांनी व्यवसायात बदल घडवून आणण्यात, नावीन्य आणण्यात आणि आव्हानात्मक परिस्थितीत नेतृत्व करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्यासोबत नव्या भूमिकेत काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत. यावेळी त्यांनी कोटेचा यांचं स्वागतही केलं. “आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्या भारतीय ग्राहकांसोबत यशाची नवीन उंची गाठत राहू,” असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.
१९८९ मध्ये भारतीय बाजारपेठेत प्रवेश
पेप्सिकोकडे Pepsi, Lay's, Kurkure, Tropicana 100%, Gatorade आणि Quaker सारखे ब्रँड आहेत. कंपनीनं १९८९ मध्ये भारतीय बाजारपेठेत एन्ट्री घेतली आणि आता येथील सर्वात मोठ्या खाद्य आणि पेय व्यवसायांपैकी एक आहे. भारतीय बाजारपेठेत कंपनीचा मोठा वाटा आहे.
संपत्ती किती?
जागृत कोटेचा यांच्या एकूण संपत्तीबद्दल सध्या कोणतीही अचूक माहिती उपलब्ध नाही. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, जागृत कोटेचा यांची संपत्ती कोट्यवधी रुपये आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार कोटेचा यांची नेटवर्थ कोटींमध्ये आहे. पेप्सिकोमध्ये मिळणारं उत्पन्न, स्टॉक होल्डिंग्स आणि अन्य गुंतवणूकीतून त्यांना उत्पन्न मिळतं. जागृत कोटेचा यांच्याकडे ३० वर्षांपेक्षा अधिक कामाचा अनुभव आहे.
पेप्सिकोपूर्वी कोटेचा १९९२ ते १९९४ या कालावधीत कॅडबरी सोबत जोडले गेले होते. त्यांनी मुंबई विद्यापीठातून बीई केमिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलंय. तसंच त्यांनी नरसी मोनजी इंस्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडिजमधून मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनचं शिक्षण घेतलंय.