Yunan Wang : डॉली चायवाला तुम्हाला माहितीच असेल. नागपूरमध्ये चहा विकणाऱ्या डॉलीवर एकदा मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांची नजर पडली. त्यांनी त्याच्यासोबत एक व्हिडीओ पोस्ट केला आणि डॉली रातोरात स्टार झाला. देशातच नाही तर विदेशातही त्याचं नाव पोहचलं. त्याला आमंत्रणं येऊ लागली. डॉलीचे व्हायरल झालेले अनेक रिल्स तुम्ही पाहिले असेल. काही हजार कमावणारा डॉली चहावाला आज कोट्यावधी रुपयांमध्ये खेळत आहे. वास्तविक, एका चिनी चहा विक्रेत्यासमोर डॉली चहावाल्याची कमाई म्हणजे किरकोळ आहे.
भारतात बहुतांश घरात दिवसाची सुरुवात चहा पिऊनच केली जाते. त्यामुळे देशात एकही शहर, गाव असं आढळणार नाही, जिथं चहा मिळत नाही. त्यामुळेच आपल्याकडे चहावालेही प्रसिद्ध होतात. पंतप्रधान मोदी यांनीही चहा विक्रेता असल्याचे अभिमानाने सांगितले होते. डॉली चहावालाही असाच आहे. आपल्याप्रमाणेच शेजारी राष्ट्र चीनमध्येही चहाला अनन्यसाधरण महत्त्व आहे. चीनमधूनच चहा जगभर पोहचल्याचंही बोललं जातं. या देशातील एका ३८ वर्षीय चहावाल्यासमोर आपले चहा विक्रेत म्हणजे काहीच नाही, अशी परिस्थिती आहे.
एका दिवसात चहावाल्याला ९५०० कोटींचा नफा
युनान वांग असे या चिनी चहावाल्याचे नाव आहे. या चहावाल्याचा समावेश आता चीनमधील अब्जाधीशांमध्ये झाला आहे. ज्यांच्या संपत्तीत एका दिवसात ९५०० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. वांग यांची गमिंग होल्डिंग्ज ही कंपनी चहाचा व्यवसाय करते. या कंपनीने आपला IPO बाजारात आणला आहे. या आयपीओला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे त्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या आकडेवारीनुसार, या आयपीओमुळे वांगची कंपनी अब्ज डॉलरच्या अंकात सामील झाली आहे.
बुधवारी त्यांच्या कंपनीचा आयपीओ बाजारात आला. पहिल्याच दिवशी आयपीओवर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या. सुमारे २३३ दशलक्ष डॉलर्सच्या या IPO ला मिळालेल्या जोरदार प्रतिसादामुळे, वांगच्या संपत्तीत एका दिवसात सुमारे १.१ अब्ज डॉलरची (सुमारे ९५०० कोटी) वाढ झाली. व्यवसायाने अभियंता असलेल्या वांग यांनी शिक्षणानंतर चहाच्या व्यवसयात प्रवेश केला.
चहाच्या दुकान ते अब्जाधीश
शिक्षण पूर्ण केल्यानंतर, वांगने २०१० मध्ये त्यांचे पहिले बबल चहाचे दुकान उघडले. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, वांगने आपला व्यावसायिक प्रवास शांघायमधील एका छोट्या शहरातून सुरू केला. हळूहळू त्याच्या चहाच्या व्यवसायाला गती मिळाली. त्याने चीनमध्ये सुमारे १०,००० चहाची दुकाने उघडली. त्यांच्या कंपनीचा चहाचा ब्रँड ‘गुड मी’ आहे. आजकाल त्याचा बबल टी विभागातील चहा चीनमधील प्रत्येक घरात पाहायला मिळतो.