गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या अमेरिकन फायनॅन्शियल रिसर्च कंपनीच्या अहवालानंतर, अदानी समूहाच्या शेअर्समध्ये 20-25 टक्क्यांची घसरण दिसून आली. 24 जानेवारी 2023 रोजी हिंडेनबर्ग रिसर्च अहवाल समोर आला होता. या अहवालात गौतम अदानी यांच्या समूहावर शेअर बाजारातील फेरफाराचे आरोप करण्यात आले होते. अहवालात अदानी समूहावर बाजारातील हेराफेरी, अकाउंटिंग फ्रॉडसारखे आरोप करण्यात आले होते. यानंतर अदानींना 48 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले.
एका सामान्य कुटुंबात जन्मलेले उद्योगपती गौतम अदानी यांचा जन्म 24 जून 1962 रोजी अहमदाबादमध्ये झाला. त्याचे फक्त बारावीपर्यंतच शिक्षण झाले आहे. आज ते भारतातील बड्या श्रीमंत उद्योगपतींमध्ये गणले जातात. अदानींचा व्यवसाय कोळसा, ऊर्जा, लॉजिस्टिक, रिअल इस्टेट, कृषी उत्पादने, मीडिया, ऑईल आणि गॅस यांसारख्या क्षेत्रात पसरलेला आहे. गेल्या आठवड्यापर्यंत, अदानी हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. परंतु अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याने फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत पहिल्या 10 क्रमांकापेक्षाही खाली गेले आहेत.
हिंडनबर्ग कंपनी काय करते?2017 मध्ये नॅथन अँडरसन नावाच्या व्यक्तीने हिंडनबर्ग नावाची ही कंपनी सुरू केली. स्टॉक मार्केट, इक्विटी, क्रेडिट आणि डेरिव्हेटिव्ह्जवर संशोधन करणे हे या कंपनीचे मुख्य काम आहे. या संशोधनातून हिंडनबर्ग कंपनीला शेअर बाजारात कुठे पैशांचा गैरवापर होत असल्याची माहितीही मिळते. अशी माहिती गोळा केल्यानंतर हिंडनबर्ग कंपनी सविस्तर अहवाल प्रकाशित करते. हिंडेनबर्गच्या अहवालाचा परिणाम जगभरातील शेअर बाजारावर अनेक वेळा दिसून आला आहे.
अदानींबाबत काय गौप्यस्फोट?हिंडेनबर्गने अदानींच्या कंपनीबाबत केलेल्या रिसर्चमध्ये 3 मोठे आरोप केले आहेत, त्यामुळे अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. हिंडेनबर्गने अदानी समूहावर पहिला आरोप केला आहे की, अदानी समूहाच्या कंपन्यांचे प्राइस अर्निंग रेश्यो अन्य कंपन्यांपेक्षा खूप जास्त आहे. त्यांनी आपल्या अहवालात दावा केला आहे की अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्सची किंमत त्याच क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या इतर कंपन्यांच्या तुलनेत 85 टक्क्यांपर्यंत अधिक आहे.
दुसरा आरोप असा की शेअर बाजारात त्यांनी गैरव्यवहार करून आपल्या शेअर्सची किंमत वाढवली आहे. अदानी समूहावर तिसरा असा आरोप आहे की कंपनीवर 2.20 लाख कोचींपेक्षा अधिक कर्ज आहे. कंपन्यांनी आपल्या क्षमतेप्कषा अधिक कर्ज घेतल्याचा दावाही हिंडेनबर्गच्या अहवालात करण्यात आलाय.
अनेक घोटाळे केले उघडअमेरिकेत इलेक्ट्रीक ट्रक तयार करणाऱ्या निकोलाच्या शेअर्सची किंमत तेजीनं वाढत होती. 2020 मध्ये हिंडेनबर्गने एक रिपोर्ट जारी केला. त्यानंतर निकोलाच्या कंपनीचे शेअर्स 80 टक्क्यांपर्यंत घसरले. आरडी लिगल, पर्शिंग गोल्डसह हिंडेनबर्गने अनेक खुलासे केले आहेत.
अदानी समूहाने काय म्हटलेय?हिंडेनबर्गच्या आरोपांवर अदानी समूहाकडून 413 पानांचे उत्तर देण्यात आलं आहे. 'मॅडऑफ्स ऑफ मॅनहट्टन' हिंडनबर्ग रिसर्चचा अहवाल वाचून आम्हाला धक्का बसला आहे आणि आम्ही अत्यंत अस्वस्थ झालो आहोत. हा अहवाल खोटा आहे. हिंडनबर्गचे दस्तऐवज निवडक चुकीच्या माहितीचे एका वाईट हेतूनं केलेलं संयोजन आहे. यात एका विशिष्ट उद्देशाने समूहाला बदनाम करण्यासाठी निराधार आरोप करण्यात आले आहेत, असंही अदानी समूहानं म्हटलंय.