anand mahindra : गेल्या काही वर्षात देशातील उद्योगपतींनी आपला कारभार आता पुढच्या पिढीच्या हाती सोपवायला सुरुवात केली आहे. अलीकडेच रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी आपल्या मुलांना अनेक उद्योगांची जबाबदारी दिली आहे. आता महिंद्रा कंपनीचे पुढचे वारसदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. देशातील प्रसिद्ध अब्जाधीशांच्या पंगतीत असलेले आनंद महिंद्रा सध्या महिंद्रा उद्योग समुहाचे प्रमुख आहेत. तुम्ही सोशल मीडियावर, विशेषत: X (पूर्वीचे ट्विटर) वर सक्रिय असाल, तर तुम्ही आनंद महिंद्रा यांचे ट्वीट्स अनेकदा पाहिले असतील. सोशल मीडियावर लोकांशी इतके कनेक्ट असूनही त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. त्यांच्या कुटुंबात किती लोक आहेत? त्यांच्यानंतर त्यांचा अब्जावधी रुपयांचा उद्योग कोण सांभाळणार? त्यांचे कुटुंबही त्यांच्या व्यवसायात सामील झाले आहे का? या प्रश्नांची उत्तरे अनेकांना माहिती नाही.
कसे आहे आनंद महिंद्रा यांचे कुटुंब?
१.९ लाख कोटी रुपयांचा महिंद्रा ग्रुप सांभाळणाऱ्या आनंद महिंद्रा यांच्या पत्नीचे नाव अनुराधा आहे. अनुराधा पत्रकार असून त्यांचे स्वतःचे व्हर्व नावाचे मासिक आहे. सध्या त्या व्हर्व आणि मॅन्स वर्ल्ड या २ मासिकांच्या संपादक आहेत. त्यांना दिव्या आणि अलिका या दोन मुली आहेत.
महिंद्रा यांच्या मुली काय करतात?
दिव्या आणि अलिका दोघीही परदेशात राहतात. त्यांच्यापैकी कोणीही महिंद्रा ग्रुपमध्ये नेतृत्व पदावर नाही किंवा त्यांची पत्नी या कौटुंबिक व्यवसायाचा भाग नाही. दिव्याने न्यूयॉर्कमधून डिझायनिंग आणि व्हिज्युअल कम्युनिकेशनमध्ये तिची पदवी पूर्ण केली आहे. पदवी पूर्ण केल्यानंतर, दिव्याने २००९ मध्ये फ्रीलान्सर म्हणून काम केले. त्यानंतर २०१५ पासून ती व्हर्व मासिकात कला दिग्दर्शक म्हणून काम करत आहे. दिव्याने मेक्सिकन वंशाच्या कलाकार डेव्हिड झापाटाशी लग्न केले असून ते अमेरिकेत स्थायिक झालेत. तर महिंद्रा यांची दुसरी मुलगी अलिका हिने फ्रेंच नागरिकाशी लग्न केले. अलिका तिची आई अनुराधा यांच्या मासिकाची संपादकीय संचालक देखील आहे.
कोण सांभाळणार व्यवसाय?
आनंद महिंद्रा यांच्या २ मुली आणि पत्नी महिंद्रा यांच्या व्यवसायापासून दूर आहेत. याबाबत विचारले असता आनंद महिंद्रा म्हणाले की, त्यांनी त्यांच्या मुलींना स्वतःचे निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. त्यांनी कधीही आपल्या मुलींवर कंपनीत जाण्यासाठी दबाव आणला नाही. त्यांच्या इच्छेनुसारच त्यांचे लग्न झाले. महिंद्रा सांगतात की, माझ्या मुलींनी स्वतःच्या इच्छेने निर्णय घ्यावेत, अशीच माझी इच्छा आहे.
एकदा बोर्डाच्या बैठकीत त्यांना विचारण्यात आले की त्यांच्या मुली या व्यवसायाचा भाग का नाहीत. याला उत्तर देताना ते म्हणाले की, त्यांच्या दोन्ही मुली कौटुंबिक व्यवसायाचा भाग आहेत. त्यांच्यासाठी महिंद्रा अँड महिंद्रा हा केवळ कौटुंबिक व्यवसाय नाही तर त्या त्यांच्या आईला मासिकांच्या कामात मदत देखील करतात. आनंद महिंद्रा यांच्या पत्नी अनुराधा यांनी दोन मासिकांची स्थापना केली. दिव्या या मासिकाच्या क्रिएटिव्ह डायरेक्टर आहेत आणि अलिका संपादकीय संचालक आहेत.
महिंद्रा यांनी सांगितले की, त्यांच्या आजोबांनी १९४५ मध्ये देशभक्तीच्या भावनेने कंपनी सुरू केली होती. त्यांनी आपल्या व्यवसायाकडे जनतेच्या पैशाचे संरक्षक म्हणून पाहिले. त्यामुळे महिंद्रा अँड महिंद्रा हा त्यांचा कौटुंबिक व्यवसाय नाही, असेही त्यांचे मत आहे. मात्र, आनंद महिंद्रानंतर महिंद्रा समूहाच्या कोट्यवधी डॉलर्सच्या व्यवसायाचे साम्राज्य कोण पुढे नेणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.