नवी दिल्ली : घाऊक क्षेत्रातील महागाईचा दर आॅगस्टमध्ये ३.७४ टक्क्यांवर गेला असून, हा दोन वर्षांचा उच्चांक ठरला आहे. वाणिज्य मंत्रालयाने बुधवारी या संबंधीची आकडेवारी जाहीर केली.
ठोक किंमत निर्देशांक जुलैमध्ये ३.५५ टक्क्यांवर होता, तसेच आॅगस्ट २0१५ मध्ये तो उणे (-) ५.0६ टक्क्यांवर होता. २0१४ च्या आॅगस्टमध्ये तो ३.७४ टक्के होता.
चालू वर्षाच्या आॅगस्टमध्ये घाऊक महागाई वाढीला डाळी, बटाटे, फळे इ. वस्तूंच्या वाढलेल्या किमती जबाबदार आहेत. वास्तविक, या महिन्यात भाज्यांचे भाव घसरून 0.१७ टक्क्यांपर्यंत खाली आले. जुलैमध्ये ते २८.0५ टक्क्यांची वाढ दर्शवत होते. कांद्याचे भाव तर उणे (-) ६४.१९ टक्क्यांपर्यंत खाली घसरले आहेत. डाळींचे भाव ३४.५५ टक्क्यांनी वाढले. बटाटे तब्बल ६६.७२ टक्क्यांनी वाढले. साखरेची महागाई ३५.३६ टक्क्यांवर, तर फळांची महागाई १३.९१ टक्क्यांवर असल्याचे दिसून आले. खाद्य क्षेत्रातील महागाई आॅगस्टमध्ये थोडी उतरून ८.२३ टक्क्यांवर आली. जुलैमध्ये ती ११.८२ टक्के होती. नोव्हेंबर २0१४ ते मार्च २0१६ या काळात घाऊक महागाई शून्याच्या खाली होती. गेल्या पाच महिन्यांपासून मात्र ती वाढत आहे. पेट्रोल (उणे ८.६५ टक्के) आणि खनिज (उणे ३.४४ टक्के) या क्षेत्रातील निर्देशांक अजूनही किंमत संकोच दर्शवत आहे. उत्पादित वस्तूंचा महागाईचा दर वाढून २.४२ टक्के झाला. जुलैमध्ये तो १.८२ टक्के होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)
घाऊक महागाई दोन वर्षांच्या उच्चांकावर
घाऊक क्षेत्रातील महागाईचा दर आॅगस्टमध्ये ३.७४ टक्क्यांवर गेला असून, हा दोन वर्षांचा उच्चांक ठरला आहे. वाणिज्य मंत्रालयाने बुधवारी या संबंधीची आकडेवारी जाहीर केली
By admin | Published: September 15, 2016 03:13 AM2016-09-15T03:13:46+5:302016-09-15T03:13:46+5:30