नवी दिल्ली : घाऊक महागाईचा दर सप्टेंबरमध्ये घसरून ३.५७ टक्क्यांवर आला. भाजीपाल्यासह खाद्य वस्तूंच्या किमतीत घसरण झाल्याने निर्देशांक उतरला.घाऊक महागाईचा दर वार्षिक पातळीवर वाढ दर्शवित होता. आॅगस्टमध्ये तो ३.७४ टक्क्यांवर होता. सप्टेंबर २0१५ मध्ये तो उणे (-) ४.५९ टक्के होता. यंदाच्या सप्टेंबरमध्ये त्यात घसरण झाल्याने सरकारला दिलासा मिळणार आहे. वाणिज्य मंत्रालयाने शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ठोक किंमत निर्देशांकावर (डब्ल्यूपीआय) आधारित महागाई कमी होण्यात भाजीपाल्याच्या किमतींनी मोठा हातभार लावला. सप्टेंबरमध्ये भाज्यांचे भाव उणे (-) १0.९१ टक्क्यांवर गेले. जुलैमध्ये भाज्या तब्बल २८.४५ टक्क्यांनी महागल्या होत्या. त्याचबरोबर कांद्याच्या किमतीही उणे (-) ७0.५२ टक्क्यांपर्यंत घसरल्या. डाळी मात्र वाढून २३.९९ टक्क्यांवर आहेत. भारतीयांच्या दैनंदिन जेवणाचा अविभाज्य भाग असलेला बटाटा ७३.३१ टक्क्यांनी महागला आहे. फळांचे भावही १४.१0 टक्क्यांनी वर चढले आहेत. खाद्य वस्तूंचा एकूण महागाई निर्देशांक मात्र घसरून ५.७५ टक्क्यांवर आला आहे. आॅगस्टमध्ये तो ८.२३ टक्के होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)
घाऊक महागाईचा दर घसरून ३.५७ टक्क्यांवर
By admin | Published: October 15, 2016 1:20 AM