लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशातील विविध बँकांत बेवारस पडून असलेला निधी २०२१-२२ मध्ये वाढून ४८ हजार कोटी रुपयांवर गेला असून, या पैशाचे योग्य वारसदार शोधण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. देशातील ८ राज्यांत विनादावा पडून असलेली रक्कम सर्वाधिक आहे.
रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालातून ही माहिती समोर आली आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये विनादावा पडून असलेली बँकांतील रक्कम ३९,२६४ कोटी रुपये होती. वित्त वर्ष २०२१-२२ मध्ये ती वाढून ४८,२६२ कोटी रुपये झाली.
येथे सर्वाधिक पैसा
तामिळनाडू, पंजाब, गुजरात, महाराष्ट्र, बंगाल, कर्नाटक, बिहार, तेलंगणा
नियम काय आहे?
नियमानुसार, बँक खात्यावर १० वर्षांपर्यंत देवघेवीचे व्यवहार न झाल्यास बचत अथवा चालू खाते बंद केले जाते. मुदत ठेवीतील पैसा ठेव परिपक्व झाल्यानंतर १० वर्षे पडून राहिला असेल तर त्यासही विनादावा अथवा बेवारस निधी मानले जाते.
काय करावे?
नियमानुसार, बँकेतील पैशाला दावेदार नसला तरी त्यावरील व्याज सुरू राहते. म्हणजे ही रक्कम दरवर्षी वाढत जाते. बंद पडलेले खाते संबंधित व्यक्ती अथवा वारसदार बँकेत जाऊन पुन्हा सुरू करू शकता तसेच खात्यावरील रक्कम काढू शकतात.