Join us  

लोक आता रिक्षा का विकत घेत आहेत?; बाजारात विक्री झाली दुप्पट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 5:31 AM

तीनचाकी वाहनांच्या विक्रीत गतवर्षीच्या तुलनेत तब्बल दुप्पट वाढ

नवी दिल्ली - गेल्या काही महिन्यांपासून दुचाकी, चारचाकी  वाहनांच्या तुलनेत तीनचाकी वाहनांची विक्री प्रचंड प्रमाणात होत आहे. जूनमध्ये वार्षिक आधारावर रिक्षांची विक्री दुप्पट वाढून ती ५३ हजार ०१९ इतकी झाली आहे. जून २०२२ मध्ये २६,७०१ रिक्षांची विक्री झाली होती. घरगुती बाजारात प्रवासी वाहनांच्या विक्रीत वार्षिक आधारावर दोन टक्क्यांची वाढ होत ३ लाख २७ हजार ४८७ वाहनांची विक्री झाली आहे. 

दुचाकी विक्री किती? गेल्या महिन्यात दुचाकी विक्रीत दोन टक्क्यांनी वाढ झाली असून, १३,३०,८२६ दुचाकी देशभरात विकल्या गेल्या आहेत. एका वर्षापूर्वी १३,०८,७६४ दुचाकींची विक्री झाली होती.

प्रवासी वाहनांची विक्री किती? एप्रिल-जून तिमाहीमध्ये प्रवासी वाहनांची विक्री ९ टक्क्यांनी वाढून ९,९५,९७४ युनिट झाली आहे. गेल्या वर्षीच्या याच काळात ९,१०,४९५ युनिट्सची विक्री झाली होती.

विक्री वाढणार का? चांगला मान्सून आणि महागाई कमी होण्याची आशा यांमुळे वाहनांच्या विक्रीत वाढ होण्याची शक्यता आहे. असे असले तरी वाढलेले व्याजदर हा चिंतेचा विषय असल्याचे सियामचे अध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी म्हटले आहे.

वाहन कर्जाची थकबाकी वाढलीरेपो दरात सतत वाढ झाल्याने वाहन कर्ज महागले आहे. त्यातच वाहन घेण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे वाहन कर्जाची थकबाकी मे महिन्यात वार्षिक २२%नी वाढून ५.०९ लाख कोटी रुपये झाली आहे.कर्ज थकबाकी (लाख कोटी)मे २०२३     ५.०९ मे २०२२     ४.१६मे २०२१     ३.६५

टॅग्स :ऑटो रिक्षा