Price Tag Strategy : सध्या सणासुदीचे दिवस सुरू असून लोक खरेदी करण्यासाठी तुटून पडले आहेत. ऑनलाईन असो की ऑफलाईन सगळीकडे लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. अनेक ई कॉमर्स कंपन्यांकडून वस्तूंवर बंपर सूट दिली जात आहे. खरेदी करताना तुम्ही एका गोष्टीकडे कधी लक्ष दिलं आहे का? प्रत्येक सेलमधील सर्व उत्पादनांच्या किंमती ९९, ४९९, ९९९ रुपये ठेवल्याला असतात. सध्या Amazon चा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल आणि फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल सुरू आहे. यातही तुम्हाला अशाच प्रकारे ९९ रुपयांचा टॅग दिसेल. कोणत्याही उत्पादनाची किंमत १ रुपयांपेक्षा कमी ठेवून या कंपन्या काय साध्य करतात? मात्र, यामागे अनेक कारणं आहेत.
सायकोलॉजिकल मार्केटिंग स्ट्रॅटेजी
प्रत्येकी १ रुपये वाचवून कोणत्याही कंपनीला काय मिळतं असा प्रश्न तुम्हाला पडत असेल. मात्र, येथे कंपनी एक मार्केटिंग स्ट्रॅटेजीचा वापर करत असते. अशा किंमतीचे टॅग सायकोलॉजिकल प्राइसिंग स्ट्रॅटेजी अंतर्गत ठेवले जातात. कमी किंमत पाहून अधिकाधिक ग्राहक आकर्षित होतील.
९ मध्ये लिहिलेली किंमत १ च्या जवळ दिसते
जेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती उत्पादनाच्या किंमतीमध्ये ९ चा आकडा पाहते. तेव्हा त्याला वाटते की उत्पादनाची किंमत कमी आहे. जर आपण सोप्या भाषेत समजायचं झालं तर, ९ च्या आकृतीमध्ये लिहिलेली किंमत ग्राहकांना १० ऐवजी एकच्या जवळ वाटते. उदाहणार्थ एखाद्या उत्पादनाची किंमत ४९९ रुपये असेल, तर ती ग्राहकांना ४०० रुपयांच्या जवळ आणि ५०० रुपयांपासून दूर वाटते. मात्र, प्रत्यक्षात हे उलट असते.
प्रयोगातून झालंय सिद्ध
सायकोलॉजिकल प्राइसिंग स्ट्रॅटेजी या विषयावर शिकागो विद्यापीठ आणि एमआयटीमध्ये काही प्रयोग करण्यात आले आहेत. या प्रयोगात महिलांचे कपडे ३४ डॉलर, ३९ डॉलर आणि ४४ डॉलर या श्रेणींमध्ये ठेवण्यात आले होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण सर्वाधिक कपडे ३९ डॉलरच्या कॅटेगरीत विकले गेल्याचे दिसून आले. या स्ट्रॅटेजीला आणखी बळ मिळाले. यामुळेच ही रणनीती मोठ्या प्रमाणात वापरली जाते.
तुम्हालाही आला असेल अनुभव
आपण ऑनलाईन शॉपिंग करताना अनुभवलं असेल की ९९९ रुपये किमतीच्या वस्तूला आपण ९०० रुपयांच्या जवळ मानतो. प्रत्यक्षात ती १ हजाराच्या जवळ असते. वास्तविक ती वस्तू १ हजार रुपयांपेक्षा फक्त १ रुपयाने कमी असते.
१ रुपयाचा खेळ समजून घ्या
उत्पादनाची किंमत १ रुपयांपेक्षा कमी ठेवण्याचे दोन फायदे आहेत. किमतीची स्ट्रेटेजी हा एक फायदा तर आहेच. दुसरा फायदा विक्रेत्याचा होतो. जर ग्राहकांनी ऑनलाइन पेमेंट न करता रोखीने केले तर बहुतेक ग्राहक १ रुपया मागे घेत नाही. अशा परिस्थितीत हे पैसे कॅश काउंटरवर बसलेल्या लोकांच्या खात्यात जातात. मात्र, गेल्या काही वर्षांत डिजिटल पेमेंटमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे, त्यामुळे १ रुपयांचा हा फायदा खूपच कमी झाला आहे.