नवी दिल्ली : देशात विमान प्रवाशांची संख्या कमालीची वाढली असली तरीही विमान कंपन्या तोट्यातच चालल्या आहेत. त्यातच विदेशातील मोठमोठ्या कंपन्याही भारतात व्यवसाय करण्यास उत्सुक आहेत. इंधन दरवाढ, स्पर्धेमुळे कमी झालेले भाडे आदी कारणांमुळे विमान कंपन्यांची हालत नाजुक बनत चालली आहे.
जेट एअरवेजचे उदाहरण घ्यायचे झाल्यास 1990 मध्ये हवाई क्षेत्र खुले झाल्यानंतर पहिली कंपनी स्थापन झाली ती हीच. परंतू आज या कंपनीही आर्थिक स्थिती ढासळलेली आहे. आज पिहल्या तिमाहीमध्ये कंपनीला 1326 कोटींचा निव्वळ तोटा झाला आहे. मागील वर्षी हीच कंपनी 58 कोटींचा फायदा झाला होता. आज कंपनीकडे पैशांची तंगी असल्याने स्टॉक सारखे घसरत आहेत. यामुळे कंपनीने कर्मचाऱ्यांचे पगार थेट 25 टक्क्यांनी कमी करण्याचा इशारा दिला होता.
या कंपनीवर आलेल्या आर्थिक संकटाला मुख्यत: भाडे दराचे भडकलेले युद्ध मानले जात आहे. केंद्र सरकारने परदेशी कंपन्यांना भारतीय हवाई क्षेत्रामध्ये सेवा पुरविण्यास संमती दिल्याने मलेशियाच्या एअर एशिया आणि सिंगापूर एअरलाईन्ससारख्या बजेट विमान कंपन्यांनी भारतीय कंपन्यांचे कंबरडेच मोडले आहे. दुसरे मोठे कारण म्हणजे इंधनाचे वाढलेले दर आणि कर. तेलावर 30 टक्के स्थानिक कर लावला जात असल्याने तेलाच्या किंमतीच आकाशाला भिडलेल्या आहेत. भारतात जेट फ्युएलची किंमत सर्वाधिक आहे.
1994 पासून वाईट काळ
भारतीय कंपन्यांसाठी 1994 पासूनच वाईट काळ सुरु झाला होता. 1994 मध्येच सरकारने परदेशी विमान कंपन्यांना भारतीय बाजारात उतरण्याची परवानगी दिली होती. यानंतर 2012 मध्ये किंगफिशर एअरलाईन्स तोट्यात जाऊन बंद झाली. यानंतर गो इंडिगो सोडल्यास अन्य 9 भारतीय कंपन्या तोट्यातच जात आहेत.