रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन Raghuram Rajan यांनी मंगळवारी एका कार्यक्रमादरम्यान देशातील तरुणांबाबत मोठा दावा केला. देशातील मोठ्या प्रमाणात तरुण आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी परदेशात जात आहे, कारण के भारतात खूश नाही, असं रघुराम राजन म्हणाले. तरुण भारतीयांमध्ये 'विराट कोहली मानसिकता' आहे आणि ते त्या ठिकाणी जातात जिकडे त्यांना अंतिम बाजारांपर्यंत पोहोचणं सोपं वाटतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
अनेक भारतीय इनोव्हेटर्स आता सिंगापूर किंवा सिलिकॉन व्हॅलीकडे जात आहेत, असा प्रश्न रघुराम राजन यांना विचारण्यात आला. "त्यांना जागतीक स्तरावर अधिक विस्तार करायची इच्छा आहे. मला असं वाटतं की एक युवा भारत आहे, त्याची मानसिकता विराट कोहलीसारखी आहे. मी जगात कोणाच्याही मागे नाही," असं ते उत्तर देताना म्हणाले. जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीत 'मेकिंग इंडिया अॅन अॅडव्हान्स्ड इकॉनॉमी बाय २०४७ : व्हॉट विल टेक इट' या कॉन्फरन्सदरम्यान त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.
'... ते विचारायला हवं'
"असं काय आहे की तरुणांना भारतात राहण्याऐवजी बाहेर जाण्यासाठी भाग पाडत आहे, हे आपण त्यांना विचारायला हवं. पण यापैकी काही उद्योजकांशी बोलणं आणि जग बदलण्याची त्यांची इच्छा पाहणं, तसंच त्यांच्यापैकी बरेचजण भारतात राहून आनंदी नाहीत हे खरोखर हृदयस्पर्शी आहे," असं रघुराम राजन यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं.