- पी. व्ही. सुब्रमण्यम (आर्थिक सल्लागार)लोक ‘उधारी’ का वाढवतात, हा मोठ्या संशोधनाचा विषय आहे. अनेक जण नातेवाईक, मित्रपरिवार, सहकाऱ्यांकडून पैसे उधार उसनवारीवर घेतात; पण लोक मुळात पैसे उधार का घेतात? - अर्थात, कुणाला आवडतं इतरांकडे पैसे मागणं? नाइलाज होतो तेव्हा उधारी करावी लागते. मात्र, इतकं सोपं नाही ते, लोक उधारी वाढवतात त्याची काही कारणं आहेत. आता त्यापैकी गरजेची किती आणि चुकीच्या आर्थिक जीवनशैलीतून येणारी किती, हे तुम्हीच ठरवा. १. खरेदीसाठी- घर, गाड्या, जमीन अगदी महागडे फोन खरेदी करण्यासाठीही लोक उधारी करतात, कर्ज काढतात ती वेगळीच.२. कर्ज फेडीसाठी- अनेकांच्या डोक्यावर खूप कर्ज होतं. शेअर्समध्ये तोटा, व्यवसायात तोटा किंवा अनेक कारणांसाठी कर्ज काढलेली असतात, एक कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज, त्यासाठी पुढची उधारी.३. आजार- हे आणखी एक मोठं कारण. बरेेच लोक वैद्यकीय विमा काढत नाहीत, मग आजार, अपघात या कारणामुळे आर्थिक संकट कोसळतं त्यामुळे उधारी करावी लागते.४. अंथरुणापेक्षा पाय जास्त पसरणे-. आपली कमाई किती याचा विचार न करता खर्च करतात. जीवनशैली, प्रतिष्ठेसाठी करायचे सोहळे, लग्नसमारंभ, अगदी लहानसहान सणवार यासाठीही खूप खर्च होतो. त्यासाठी काही जण पर्सनल लोनही काढतात. त्यात मोठी गाडी घेणं, परदेशी प्रवास, महागडे गॅजेट्स याचाही खर्च वाढतो.आता प्रश्न, ही उधारी टाळता येईल का? २, ३, ४ तर नक्की टाळता येतील. तुम्हाला शेअर बाजारात कसं ट्रेड करतात हे माहिती नसेल, आत्मविश्वास नसेल तर त्या वाटेनं जाऊ नका.कुटुंबासाठी योग्य वैद्यकीय विमा घेणं आवश्यक आहे. तो खर्च नव्हे, गुंतवणूक समजा, म्हणजे वैद्यकीय खर्चाचा बोजा पडणार नाही. आणि प्रतिष्ठेसाठी खर्च करणं सोडा. कर्जासाठी उधारी बंद करा. आपल्याला का कर्ज होत आहेत याचा विचार करा आणि अनावश्यक सोहळ्यांवरचे खर्च टाळा. जीवनशैलीतल्या अनावश्यक गोष्टी टाळा.आपल्या हातात पैसेच कमी येतात म्हणून उधारी करावी लागते असं काही जण सांगतात; पण त्यांनी हे तपासून पाहावं की आपल्या गरजा, कर्ज आणि खर्च याचं काही गणित गडबड होतं आहे का?
उधारी का वाढते? कर्ज का चढतं?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2021 5:29 AM