जेव्हा जेव्हा तुम्ही एखादा चित्रपट किंवा क्रिकेट किंवा कोणताही शो टीव्ही किंवा ऑनलाइन पाहता तेव्हा त्यात जाहिराती येतात. यामध्ये ब्रोकरेज फर्म्सच्या जाहिरातीही भरपूर येतात. पण एक ब्रोकरेज फर्म अशी आहे ज्यांच्या कोणत्याही जाहिराती दिसत नाहीत. ही ब्रोकरेज फर्म म्हणजे झिरोधा (Zerodha).
झिरोधाचे सहसंस्थापक आणि सीईओ नितीन कामथ (Nithin Kamath) यांनीही जाहिरात का करत नाही याचं कारण सांगितलं आहे. याशिवाय गुंतवणूक म्हणून जीवन विमा पॉलिसी विकण्याची गरज नसल्याचंही त्यांनी सांगितले. यासंदर्भातल त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर केलीये. क्रिकेट सामने पाहताना मोठ्या संख्येनं ब्रोकरेज कंपन्यांच्या जाहिराती पाहिल्यानंतर त्यांनी यासंदर्भात उल्लेख केला.
काय म्हणाले कामथ?
"बऱ्याच दिवसांनंतर एक क्रिकेट सामना पाहत होतो आणि त्यात प्रत्येक चौथी जाहिरात ब्रोकरेज फर्मची होती हे दिसलं. हे शेअर बाजारासाठी चांगले संकेत आहेत. कंपनीतील आणि बाहेरील अनेक जण मला झिरोदा स्वत:ची जाहिरात का करत नाही असं विचारतात. जेव्हा तुम्हाला ग्राहकांकडे अॅक्वेझेशन कॉस्ट आणि लाईफ टाईम व्हॅल्यूमध्ये पाहण्याची गरज नसते, तेव्हा चांगलं वाटतं. अशावेळी आम्हाला ग्राहकांवर ट्रेड करण्यासाठी दबाव टाकवा लागत नाही. यामुळे प्लॅटफॉर्म स्पॅम फ्री राहतो. झिरोधाला लाइफ इन्शुरन्स पॉलिसी ही विकावी लागत नाही," असं नितीन कामथ म्हणाले.