Tariff War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर आपलंच घोडं दामटत जगावर आयात शुल्काचा लादलं आहे. आधी चीन, कॅनडा आणि मेक्सिकोवर टॅरिफ लागू केलं होतं. पण, पण २ एप्रिलच्या घोषणेमध्ये त्यांनी जगातील ५० देशांवर आयात शुल्क लावले आहे. मित्र असो वा शत्रू, ट्रम्प यांनी कुणालाही सोडले नाही. अमेरिकेत निर्यात करणाऱ्या प्रत्येक देशावर आयात शुल्क लादले आहे. पण, ट्रम्प यांनी काही देशांवर १० टक्के तर इतरांवर ४९ टक्के शुल्क लादले आहे. हे असं करण्यामागील कारणही त्यांनी सांगितले. याचा परिणाम जसा शुल्क लादलेल्या देशांवर होणार आहे. त्याचप्रमाणे तो अमेरिकन नागरिकांवरही होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
टॅरिफमध्ये विसंगती का?टॅरिफमध्ये विसंगतीला ट्रम्प यांनी 'डिस्काउंटेड टॅरिफ' असं म्हटलं आहे. चीन, भारत, इस्रायल असो की पाकिस्तान, सर्वांनाच ट्रम्प यांच्या घोषणेचा फटका सहन करावा लागला. आयात शुल्क लादताना काही देशांवर १० टक्के तर इतरांवर ४९ टक्के का लादले गेले असा प्रश्न पडतो. यूके, ब्राझील आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांवर केवळ १० टक्के आयात शुल्क लागू असताना भारतावर २६ टक्के शुल्क का लादण्यात आले.
डिस्काउंटेड टॅरिफ म्हणजे काय?ट्रम्प यांनी या निर्णयाला 'डिस्काउंटेड टॅरिफ' असे नाव दिले आहे. हा सवलतीचा दर केवळ भारतावरच नाही तर चीन आणि इतर सर्व देशांवरही लागू करण्यात आला आहे. आम्ही जसास तसे आयात शुल्क लादला नसून व्यावसायिक प्रतिस्पर्ध्यांबद्दल उदारता दाखवली असल्याचे ट्रम्प म्हणाले. अमेरिकेला हवे असते तर आणखी कठोर पावले उचलता आली असती. मात्र, भविष्यात याला वाव आहे. याचा अर्थ अमेरिका हे शुल्क आणखी वाढवू शकते.
भारतावर २६ टक्केच शुल्क का?ट्रम्प यांनी आपल्या घोषणेमध्ये सांगितले की, भारतावर २६ टक्के सवलतीचे शुल्क लागू केले जात आहे. काही देशांवर १० टक्के शुल्क लागू असताना भारतावर २६ टक्के शुल्क का लादण्यात आले? इतर देशांप्रमाणे १० टक्के शुल्क का लादले नाही, असा प्रश्न यातून उपस्थित होतो. वास्तविक, अमेरिकेने प्रत्येक देशावर अमेरिकन उत्पादनांवर ५० टक्के शुल्क लादले आहे. उदाहरणार्थ, भारत अमेरिकन उत्पादनांवर सरासरी ५२ टक्के शुल्क आकारतो, त्यामुळे अमेरिकेने यापैकी ५० टक्के म्हणजे भारतीय उत्पादनांवर २६ टक्के शुल्क लावले आहे.
वाचा - अनिल अंबानींच्या कंपनीचा शेअर सूसाट...₹11 वरुन ₹260 वर गेला भाव, कारण काय?
पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशवर कितीअमेरिकेने भारताच्या शेजारी देशांवरही शुल्क लादले आहे. पाकिस्तानने अमेरिकेवर ५८ टक्के शुल्क लादले, तर ट्रम्प यांनी २९ टक्के शुल्क लादले. त्याचप्रमाणे बांगलादेशने अमेरिकन उत्पादनांवर ७४ टक्के शुल्क लावल्याने त्यावर ३७ टक्के शुल्क लावण्यात आले आहे, तर ट्रम्प यांनी श्रीलंकेवर ४४ टक्के शुल्क लावण्याचे जाहीर केले आहे. कारण श्रीलंका अमेरिकन उत्पादनांवर ८८ टक्के शुल्क आकारते.