मुंबई : बिहार निवडणूक आणि मध्य प्रदेश, राजस्थान पोटनिवडणुकीनंतर सलग तीन दिवसांपासून इंधन दरात वाढ करण्यात येत आहे. निवडणुकीसाठी इंधन दर कमी केले जातात. निवडणूक संपल्यावर पुन्हा वाढवले जातात. कोरोनाच्या संकटामुळे वाहतूकदार संकटात आहेत. या स्थितीत इंधन दरवाढ कशासाठी ? असा सवाल ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसने केला.
ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे नेते मालकीत सिंग म्हणाले की, कोरोनामुळे सामान्य जनता, वाहतूकदार आर्थिक संकटात आहेत. निवडणुकीनंतर इंधन दरवाढ करण्याचे कोणतेही वैध कारण नाही. इंधन दरवाढीमुळे इतर वस्तूंच्या किमतीवर परिणाम होतो. त्याचा फटका सामान्य व्यक्तीला बसतो. केंद्र सरकारने इंधन दरवाढ थांबवावी. याबाबत पंतप्रधान, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री, रस्ते वाहतूक मंत्रालय यांना पत्र पाठवल आहे.
केंद्र सरकार जनतेचे की, सावकाराचे ?
काँग्रेस सरकारच्या काळात इंधन दरवाढ झाल्यास भाजपकडून मंत्र्यांना बांगड्या पाठवण्यात येत होत्या. आता ते सत्तेत आहेत, तरी त्यांचे नेते गप्प बसले आहेत. आजही पूर्णपणे गाड्या रस्त्यावर आलेल्या नाहीत. ३० ते ४० टक्के गाड्या बंद आहेत. सरकारने मार्च २०२१ पर्यंत तरी इंधन दरवाढ टाळायला हवी होती. इंधन दरवाढीमुळे महागाई वाढेल आणि त्यामध्ये सामान्य जनता भरडली जाईल. केंद्र सरकार जनतेचे की सावकारांचे, असा प्रश्न पडला आहे.
- संजय नाईक, अध्यक्ष मनसे वाहतूक सेना