अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी देशातील वाढत्या महागाईसाठी (Inflation) हंगामी समस्यांना जबाबदार धरलं आहे. हंगामी समस्यांमुळे पुरवठा कमी झाला, त्यामुळे महागाई वाढली, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं. मात्र, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी करण्याचे प्रयत्न सुरू असून त्यावर सातत्यानं लक्ष ठेवलं जात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. सीतारामन यांनी इंधन आणि नैसर्गिक वायूच्या किमती कमी करण्याच्या प्रयत्नांचाही उल्लेख केला. इंधन आणि नैसर्गिक वायूची आयात केली जाते आणि कोविड, रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत इंधनाचं दर अधिक असल्याचं सीतारामन म्हणाल्या.
कर्नाटकातील कलबुर्गी येथे पत्रकारांशी निर्मला सीतारामन यांनी संवाद साधला. “हंगामी पातळीवर पुरवठ्याशी संबंधित समस्यांमुळे महागाई वाढली आहे. जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता आणि त्यांच्या किमती यावर टीम बारीक लक्ष ठेवून आहे. परिस्थितीनुसार आवश्यकतेनुसार अतिरिक्त साठा जारी करण्यात आला. जेव्हा तांदळाचे भाव वाढले तेव्हा आम्ही बफर स्टॉकमधून तांदूळ दिला. केंद्र सरकार दर कमी करण्यासाठी सातत्यानं पावले उचलत आहे. यामुळेच किरकोळ महागाईचा दर आता ६ टक्क्यांच्या खाली आला आहे,” असं सीतारामन म्हणाल्या. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींबाबत विचारलेल्या प्रश्नालाही त्यांनी उत्तर दिलं. कोविड आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत इंधनाच्या किमती वाढल्या आहेत. मात्र, इंधनाचे दर योग्य पातळीवर ठेवण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
गव्हाच्या खरेदीला गतीगव्हाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारनं गहू खरेदीला गती दिली आहे. चालू आर्थिक वर्षात ३.४१ कोटी टन गहू खरेदी करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. आतापर्यंत १.७० कोटी टन गव्हाची खरेदी झाली आहे. एका सरकारी अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार गव्हाच्या खरेदीला गती देणं आवश्यक आहे जेणेकरून पुरवठ्यानुसार किरकोळ बाजारात गव्हाचा पुरवठा करता येईल. पुरवठ्याबाबत काही गडबड झाल्यास गव्हाच्या दरात वाढ होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.