प्लास्टिक ही जगासमोरील मोठी समस्या बनत आहे. देशातही अनेक प्रकारच्या प्लास्टिकवर निर्बंध घालण्यात आलेत. दरम्यान, ग्राहकांच्या संख्येनुसार देशातील सर्वात मोठी ब्रोकरेज फर्म, झिरोदाचे (Zerodha) संस्थापक नितीन कामथ यांनी जगभरातील प्लास्टिकच्या वाढत्या समस्येकडे लोकांचं लक्ष वेधण्यासाठी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. प्लास्टिकच्या बाटल्यांपासून आता पूर्णपणे सुटका होईल असं शक्य वाटत नाही. परंतु प्लास्टिकच्या बाटल्या सातत्यानं लहान का होत आहेत हे समजत नसल्याचं त्यांनी म्हटलंय. कसं मिळालं Zerodha ला इतकं मोठं यश, नितीन कामथ यांनी केला खुलासा; लोकांचीही होतेय कमाई
ग्राहकांच्या पैसे खर्च करण्याच्या क्षमतेनुसार पॅकेज्ड वॉटर बनवणाऱ्या कंपन्यांनी २०० मिली पाण्याच्या बाटल्या बाजारात आणल्या आहेत. झिरोदाचे संस्थापक नितीन कामत यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे. जर तुम्ही प्रवास करत असाल आणि पाण्याची बाटली सोबत घेऊन जात नसाल तर लहान प्लास्टिकच्या बाटलीमुळे तुम्हाला दिवसातून अनेक वेळा पाणी विकत घ्यावं लागतं आणि तुम्हीच जगात प्लास्टिकची समस्या वाढवण्यास मदत करत असता, असं कामथ म्हणाले.
सरकारनं यावर बंदी आणावी अशी अपेक्षा कामथ यांनी व्यक्त केली. सरकारनं जर लवकरच यावर विचार केला नाही,तर १ लिटरच्या पाण्याच्या बाटलीऐवजी ५०० मिली, २०० मिली आणि १०० मिलीच्या पाण्याच्या बाटल्याही बाजारात येऊ शकतात, असं ते म्हणाले.
भविष्यात एक घोट पाण्यासाठीही प्लास्टिकची बाटली येऊ लागेल. यामुळे प्लास्टिकची समस्या भीषण रुप धारण करेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. जेव्हा आपण पाणी विकत घेतो तेव्हा आपण पाण्याचे नाही, तर त्या प्लास्टिकच्या बाटलीची किंमत देतो, असं नितीन कामथ म्हणाले.