Join us

Ratan Tata Ventures : जगभर व्यवसाय पोहचवणाऱ्या रतन टाटांना या उद्योगात आलं अपयश! कायमचा केला रामराम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2024 2:32 PM

Ratan Tata Ventures : व्यापार जगतात रतन टाटा यांच्याइतका मान फार कमी लोकांना मिळाला आहे. मात्र, हेच रतन टाटा एका व्यवसायत अपयशी ठरले. त्यांनी या क्षेत्राला कायमचा रामराम केला.

Ratan Tata Ventures : उद्योगपती रतन टाटा यांचं देश उभारणीत मोठं योगदान आहे. अगदी मिठापासून एअर इंडियापर्यंत अनेक क्षेत्रात त्यांचा व्यवसाय विस्तारला आहे. 'टाटा' नावाला जगभरात ब्रँड बनवण्याचं काम रतन टाटा यांनी केलं. उद्योगपती रतन टाटांना नाविन्य आणि यशाचे दुसरं नाव म्हणतात. मात्र, एका क्षेत्रात रतन टाटा यांना सपाटून मार खावा लागला. दुर्दैवाने त्यांनी पुन्हा एका व्यवसायात कधीच पाऊल ठेवलं नाही.

एखाद्या चित्रपटातील नायक शोभावे असं व्यक्तीमत्व रतन टाटा यांचं आहे. कदाचित यामुळेच की काय पण एकेकाळी त्यांनी बॉलिवूडमध्येही एन्ट्री केली होती. हे फार कमी लोकांना माहिती आहे. टाटांनी २००४ मध्ये दिग्गज बॉलिवूड स्टार्ससोबत रोमँटिक सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटाची निर्मिती केली. मात्र, यावेळी रतन टाटा आणि हा चित्रपट अपयशी ठरला. निर्मितीची किंमतही हा चित्रपट वसूल करू शकला नाही. यानंतर रतन टाटा यांनी या व्यवसायाला कायमचा टाटा केला.

या चित्रपटात अमिताभ बच्चन, जॉन अब्राहम आणि बिपाशा बसू यांसारख्या दिग्गज कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. ऐतबार असं विक्रम भट्ट यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाचे नाव होते. हा चित्रपट १९९६ मध्ये प्रदर्शित झालेल्या हॉलिवूड चित्रपट “भय” वरून प्रेरित होता.

चित्रपटाच्या कथेत, अमिताभ बच्चन यांनी डॉ. रणवीर मल्होत्राची भूमिका साकारली होती. जो आपली मुलगी रिया मल्होत्रा ​​(बिपाशा बसू) हिला तिच्या वेडसर प्रियकर आर्यन त्रिवेदी (जॉन अब्राहम) पासून वाचवण्याचा प्रयत्न करतो. ऐतबार रतन टाटा यांनी इतर अनेक निर्मात्यांच्या सहकार्याने बनवला होता. त्यावेळी ९ कोटी ५० लाख रुपयांत या चित्रपटाची निर्मिती झाली होती. परंतु, बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने केवळ ७ कोटी ९६ लाख इतकेच कमावले.

रतन टाटा निर्मित या चित्रपटाला प्रेक्षकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला. अमिताभ बच्चन यांनी नेहमीप्रमाणे चांगला अभिनय केला. पण बाकीचे कलाकार काही विशेष करू शकले नाहीत. या चित्रपटाच्या अपयशानंतर रतन टाटा चित्रपट निर्मितीपासून दुरावले. त्यानंतर त्यांनी कधीही चित्रपटाची निर्मिती केली नाही.

रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहटाटा हे भारतीय उद्योगक्षेत्रात जितके मोठे नाव आहे, तितकाच सन्मान रतन टाटा यांनाही मिळतो. रतन टाटा यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली या समूहाला अनेक नवे आयाम दिले. यामध्ये टाटा नॅनोपासून ते टीसीएसपर्यंतच्या नावांचा समावेश आहे. आज अनेक क्षेत्रात टाटा ग्रुपचा व्यवसाय जगभर पोहचला आहे. अलिशान गाड्यांपासून सॅटेलाईटच्या डिशपर्यंत टाटा नवनवीन क्षेत्रात झेप घेत आहेत.

टॅग्स :रतन टाटाटाटाव्यवसाय