Tata investment in Breach Candy Hospital :टाटा समुहाने ज्या क्षेत्रात पाऊल ठेवलं तिथं आपला ब्रँड प्रस्थापित केला आहे. दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचा हा समूह वाढवण्यात सिंहाचा वाटा आहे. याचीच आठवण ठेवण्यासाठी आता टाटा समुहाने मोठा निर्णय घेतला आहे. रतन टाटा यांनी अखेरचा श्वास घेतलेल्या मुंबईतील प्रसिद्ध ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये टाटा समूह मोठी गुंतवणूक करणार आहे. कंपनी दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे.
टाटा ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये गुंतवणूक का करत आहेत? टाटा यांचे स्वतःचे टाटा मेमोरियल नावाने हॉस्पिटल आहे. मुंबईतील प्रसिद्ध रुग्णालयांमध्ये त्याचा समावेश होतो. अशात आता समूह आणखी एका हॉस्पिटलमध्ये गुंतवणूक करणार आहे. वास्तविक कंपनी आरोग्य सेवा क्षेत्रात आपली पकड मजबूत करत आहे. १९४६ मध्ये बांधलेल्या या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये टाटा सर्वात मोठे आर्थिक भागीदार बनणार आहेत. टाटाच्या या ५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीमुळे ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान सुधारण्यास मदत होईल.
टाटांना गुंतवणुकीतून काय मिळणार?या गुंतवणुकीनंतर टाटा समूहाला ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये काही अधिकार मिळणार आहेत. रुग्णालयाच्या विद्यमान १४ सदस्यीय विश्वस्त मंडळामध्ये त्यांचे ३ प्रतिनिधी नियुक्त करण्याचा अधिकार मिळेल. यासह टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन ब्रीच कँडी हॉस्पिटल ट्रस्टचे अध्यक्ष बनतील. ते १ ऑक्टोबर २०२५ पासून दिग्गज बँकर दीपक पारेख यांची जागा घेतील.
ब्रीच कँडी हॉस्पिटलचे नाव बदलणार? टाटा सर्वात मोठे भागीदार बनल्यानंतर ब्रीच कँडी हॉस्पिटलचे नाव बदलणार का?, असा प्रश्न उपस्थित होत होता. पण, तसे काही होणार नाही. फक्त, टाटा ब्रँड हे नाव कोणत्या ना कोणत्या स्वरूपात जोडले जाईल. मुंबईतील टाटा समूहाचे हे तिसरे रुग्णालय असेल. याआधी टाटांचे मुंबईतील परळ येथे टाटा मेमोरियल सेंटर आहे, गेल्या वर्षीच रतन टाटा यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून त्यांनी महालक्ष्मी येथे पशुवैद्यकीय रुग्णालय स्थापन केले होते.
रतन टाटा यांचे अतुट नातेब्रीच कँडी हॉस्पिटल हे रतन टाटा यांच्या खूप जवळचे आहे. कारण, ते आजारी पडल्यानंतर याच रुग्णालयात आणले जात होते. रतन टाटा यांनी या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. रतन टाटाच नाही तर रिलायन्सचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांनीही याच रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. अमिताभ बच्चन ते बॉलिवूड आणि बिझनेस जगतातील दिग्गज व्यक्ती या रुग्णालयात उपचार घेतात. या रुग्णालयात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती.