भारतीय रेल्वे हे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. जर संपूर्ण भारता देश फिरून मनसोक्त आनंद घ्यायचा असेल, तर भारतीय रेल्वे हे एक सर्वात किफायतशीर साधनांपैकी एक आहे. 16 एप्रिल 1853 रोजी भारतातील पहिली पॅसेंजर ट्रेन बोरी बंदर अर्थात मुंबई ते ठाणे अशी धावली होती. या ट्रेनने 34 किलोमीटरचे अंतर कापले होते. प्रवासी वाहतुकीबरोबरच व्यापार वाढविण्यातही रेल्वेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
रोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. मात्र, काही गोष्टी डोळ्यांसमोर असूनही आपण त्याकडे लक्ष देत नाही अथवा त्यावर विचार करत नाही, त्या समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. असेच, रेल्वेच्या वेगवेगळ्या डब्यांवर वेगवेगळ्या रंगाच्या पट्ट्या (Color Strips) असतात, त्यांचा अर्थ काय? याचा आपण कधी विचार केलाय? जाणून घेऊयात...
प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी भारतीय रेल्वे अनेक पावले उचलत असते. यासाठीच रेल्वेच्या डब्यांवर विविध रंगांच्या पट्ट्या दिलेल्या असतात. मात्र रेल्वेवर दिलेल्या लाल, पिवळ्या आणि पांढऱ्या पट्ट्यांचा नेमका अर्थ काय? हे अनेकांना माहीत नसते.
लाल आणि नीळ्या डब्ब्यांवर पिवळ्या रंगाच्या पट्ट्या - ट्रेनच्या लाल आणि निळ्या डब्यांवर पिवळ्या रंगाच्या पट्ट्या दिलेल्या असतात. यामुळे लक्षात येते, की हे डबे दिव्यांग आणि आजारी अथवा अस्वस्थ वाटणाऱ्या प्रवाशांसाठीही आहेत.
निळ्या रंगाच्या डब्यावर पांढऱ्या पट्ट्या -एखाद्या विशेष रेल्वेचा नॉन-रिझर्व्हड सेकंड क्लासचा डबा दर्शविण्यासाठी निळ्या रंगाच्या रेल्वे कोचवर पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या दिलेल्या असतात. या पट्ट्यांमुळे प्रवाशांना जनरल डबे शोधणे सोपे होते.
ग्रे कलरच्या डब्यांवर हिरव्या आणि लाल रंगाच्या पट्ट्या -जर एखाद्या ट्रेनच्या ग्रे कलरच्या डब्यावर हिरव्या रंगाच्या पट्या असतील तर, तर याचा अर्थ तो डबा महिलांसाठी आरक्षित आहे. तसेच ग्रे कलरच्या डब्यावर लाल पट्ट्या असतील, तर त्याचा अर्थ ते ईएमयू/एमईएमयू ट्रेनचे फर्स्ट क्लास कंपार्टमेंटचे डबे आहेत.