Join us

₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिरयानी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 10:21 IST

Biryani By Kilo Company Sold Out: दोन मित्रांनी त्यांच्या चांगल्या पगाराच्या नोकऱ्या सोडल्या आणि बिर्याणी बाय किलोची (Biryani By Kilo) सुरुवात केली. आयआयटी पदवीधर विशाल जिंदाल यांनी त्यांचा मित्र कोशिक रॉय यांच्यासोबत बिर्याणी विकण्यास सुरुवात केली.

Biryani By Kilo Company Sold Out: झोमॅटो आणि स्विगी सारख्या ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅप्सवर बिर्याणीच्या ऑर्डर सर्वाधिक आहेत यावरून भारतात बिर्याणीची क्रेझ किती आहे याचा अंदाज लावता येतो. जर ती बिर्याणी एका भांड्यात गरम गरम वाढली तर ती फक्त चवीलाच छान लागते असं नाही तर पोटाला आणि मनालाही समाधान देते. हा विचार मनात ठेवून, दोन मित्रांनी त्यांच्या चांगल्या पगाराच्या नोकऱ्या सोडल्या आणि बिर्याणी बाय किलोची (Biryani By Kilo) सुरुवात केली. आयआयटी पदवीधर विशाल जिंदाल यांनी त्यांचा मित्र कोशिक रॉय यांच्यासोबत बिर्याणी विकण्यास सुरुवात केली. पाहता पाहता हा व्यवसाय मोठाही झाला.

२०१५ साली सुरू झालेली बिर्याणी बाय किलो आता विकली जाणार आहे, १० वर्षांचा त्यांचा हा प्रवास उत्तम राहिला आहे, पण आता या बिर्याणी बाय किलोला नवा खरेदीदार मिळालाय. खरं तर देवयानी इंटरनॅशनल ही कंपनी विकत घेणार आहे. तर देवयानी इंटरनॅशनल भारतात केएफसी, पिझ्झा हट आणि कोस्टा कॉफी सारखे ब्रँड चालवते. आता त्यांच्या या यादीत बिर्याणी बाय किलोचंही नाव समाविष्ट होणारे.

पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१

२०१५ मध्ये सुरुवात

विशाल जिंदाल आणि कौशिक रॉय यांनी ग्रुरुग्राममध्ये आपल्या या स्टार्टअपची सुरुवात केली. मोठी डिग्री घेऊन त्यांनी जेव्हा बिर्याणी विकायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्यावर बरीच टीका झाली होती, पण त्यांची चव काम करेल याची त्यांना खात्री होती आणि नेमकं तेच घडलं. बिर्याणी बाय किलोला पसंती मिळू लागली. क्लाउड किचनमध्ये ऑर्डरनुसार हंडीमध्ये ही बिर्याणी बनवली जाते आणि मग ती हंडीमध्येच सर्व्ह केली जाते.

हंडीवाल्या बिर्याणीनं जिंकली लोकांची मनं

बिर्याणी बाय किलोची सुरुवात छोटीशी होती, पण कंपनीच्या दोन्ही संस्थापकांची मोठी स्वप्नं होती. सुरुवातीच्या काही महिन्यांत या ब्रँडनं केवळ काही लाख रुपयांची बिर्याणी विकली होती, पण विशाल आणि कौशिक यांना विश्वास होता की ते फूड इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवू शकतील. त्यांनी बिर्याणीच्या चार प्रकारांसोबत फ्लेवर सर्व्ह करायला सुरुवात केली. हैदराबादी, लखनौ, कोलकाता आणि गुंटूर बिर्याणीनं लोकांची मने जिंकली.

४५ शहरांमध्ये १०० हून अधिक आउटलेट्स

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी आता दरमहा २२ ते २५ कोटी रुपयांचा महसूल कमावते. बिर्याणी बाय किलोदेशातील ४५ हून अधिक शहरांमध्ये १०० हून अधिक आउटलेट्स चालवते. दहा वर्षांत कंपनीचं मूल्यांकन ८,९४,५०,०१,०१९ रुपयांवर पोहोचलंय.

नवीन खरेदीदार कोण?

देवयानी इंटरनॅशनलनं बिर्याणी बाय किलो खरेदी करुन मोठा डाव खेळला आहे. कंपनीचे भारत, नेपाळ आणि नायजेरियामध्ये ९०० हून अधिक केएफसी स्टोअर्स आणि ५८० हून अधिक पिझ्झा हट स्टोअर्स आहेत. तर १९० पेक्षा जास्त कोस्टा कॉफी कॅफे आणि ७० पेक्षा जास्त वांगो स्टोअर आहेत. आता ही कंपनी भारताच्या पारंपारिक खाद्य व्यवसायात प्रवेश करत आहे. भारतात बिर्याणीची लोकप्रियता कोणापासून लपून राहिलेली नाही, आता बिर्याणी बाय किलो खरेदी करून त्यांना या श्रेणीत आपली पकड मजबूत करायची आहे. दरम्यान, या कराराचं मूल्य किती याची माहिती समोर आलेली नाही.

टॅग्स :व्यवसायअन्न