Join us

अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 16:40 IST

Donald Trump America : डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर अब्जाधीश गौतम अदानी यांच्यावरील २६.५ कोटी डॉलरच्या लाचखोरीचा खटला मागे घेतला जाऊ शकतो.

Donald Trump America : डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर अब्जाधीश गौतम अदानी यांच्यावरील २६.५ कोटी डॉलरच्या लाचखोरीचा खटला मागे घेतला जाऊ शकतो. प्रसिद्ध इंडो-अमेरिकन वकील रवी बत्रा यांनी ही अपेक्षा व्यक्त केली आहे. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरील लाचखोरीचा खटला मागे घेण्याची शक्यता कायम आहे, असंही तं म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प २० जानेवारी २०२५ रोजी अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत.

यामागचा तर्क काय?

भारतीय वंशाचे अमेरिकन वकील रवी बत्रा यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी संवाद साधला. "प्रत्येक नव्या राष्ट्राध्यक्षांची नवी टीम असते. ट्रम्प यांनी अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष शपथ घेतल्यानंतर एखाद्याला लक्ष्य करण्यासाठी कायद्याचा वापर करण्यावर आधारित कोणताही खटला करू शकतात," असे ते म्हणाले. "आपल्या विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी कायद्याचा वापर केल्यानं आपल्या संघराज्यघटनेतील कायद्याच्या समान संरक्षणाची हमी देण्याचं उद्दिष्ट मुळातच नाकारलं जातं," असंही बत्रा म्हणाले.

आपल्या सरकारकडे दाद मागू शकतात

हा मुद्दा गौतम अदानी आपल्या सरकारकडे मांडू शकतात आणि आगामी ट्रम्प प्रशासनासमोर हा मुद्दा द्विपक्षीय पद्धतीनं मांडण्याची विनंती करू शकतात, असंही ते म्हणाले. "राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा नवीन न्याय विभाग आणि एसईसी (सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशन) फौजदारी किंवा दिवाणी आरोप निराधार वाटल्यास फौजदारी आणि दिवाणी खटले मागे घेऊ शकतात," असंही बत्रा यांनी नमूद केलं.

भारतीय उद्योगपती आणि या प्रकरणातील ज्यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत ते अमेरिकेत राहत नसल्यानं अमेरिकेचे कायदे देशाबाहेर लागू करण्याचा मुद्दाही उपस्थित होतो, असंही बत्रा म्हणाले. गौतम अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर अदानी यांच्यासह सात जणांवर २६.५ कोटी डॉलरची लाच दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. दरम्यान, अदानी समूहाकडून या आरोपांचं खंडन करण्यात आलेलं आहे.

टॅग्स :अदानीगौतम अदानीडोनाल्ड ट्रम्प