जगभरात एआयचा वापर झपाट्यानं वाढत आहे. जगातील अनेक कंपन्या आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (Artificial Intelligence) भरपूर वापर करत आहेत. एआयच्या आगमनामुळे अनेक गोष्टी सहजरित्या करणं शक्य होतंय. पण ज्या प्रकारे एआयचा वापर वाढत आहे, त्यामुळे भविष्यात लोकांच्या नोकऱ्या जाण्याचीही शक्यता काहींनी व्यक्त केलीये. इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी एआयच्या आगमनामुळे भविष्यात नोकरीच्या शक्यतांवर कसा परिणाम होऊ शकतो यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नारायण मूर्ती यांनी एका मुलाखतीदरम्यान एआयवर आपलं मत मांडलं. "मानवी मेंदू सर्वात शक्तिशाली आहे. त्याच्याशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही. त्यांनी १९७५ मधील 'केस टूल्स' नावाच्या तंत्राचं उदाहरण दिलं ज्यामुळे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधील नोकऱ्या कमी होतील असं मानलं जात होतं," असं नारायण मूर्ती म्हणाले. देवानं दिलेलं सर्वात शक्तिशाली साधन म्हणजे मानवी मेंदू असल्याचा ते म्हणाले.
AI चं स्वागत करा
"नोकऱ्या जाण्याची भीती ही अधिक वाढवून सांगितली जात आहे. एआय नोकऱ्या कशा बदलेल यावर चर्चा करण्याऐवजी लक्ष देण्याची गरज आहे. तो कशाप्रकारे मानवी श्रम वाढवेल यावर चर्चा करायला हवी. एआयचं स्वागत केलं पाहिजे. याला नियंत्रित केलं पाहिजे आणि एक चांगलं टूल म्हणून त्याचा वापर झाला पाहिजे," असंही नारायण मूर्ती म्हणाले.
नोकऱ्या जाण्याचा दावा फेटाळला
एआयमुळे नोकऱ्या जाऊ शकतात हा दावा फेटाळण्याची मूर्ती यांची ही पहिलीच वेळ नाही. याआधी ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या (आयमा) स्थापना दिनी बोलताना ते म्हणाले होते की, एआयमुळे जीवन सुखकर होईल. त्याचबरोबर तंत्रज्ञानाचा दबदबा निर्माण होण्याला मानव कायमच रोखणार आहे. मानवी मन तंत्रज्ञानापेक्षा एक पाऊल पुढे आहे, असंही ते म्हणाले.