Join us

AI ठरवणार भारताचं भविष्य? जगभरातील कंपन्या करतायेत कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक; नोकऱ्यांचं काय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 14:13 IST

AI Based Personalized Services : भारतात आर्टिफिशियल इंटेलिजेन्स अर्थात एआयचं रोपटं हळूहळू बाळसं धरू लागलं आहे. येत्या काळात एआयमुळे देशात मोठी उलथापालथ पाहायला मिळू शकते.

AI Opportunity in India : सध्या सगळीकडे एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (कृत्रिम बुद्धीमत्ता) तुमच्या कानावर पडत असेल. खिशातील मोबाईलपासून, घरातील टीव्ही, वॉशिंगमशीन्स ते वाहनांपर्यंत सर्व गोष्टींमध्ये एआय आलं आहे. भविष्यात सर्वच वस्तूंमध्ये एआय आलं तर वावगं ठरू नये, अशी परिस्थिती आहे. भारतात दिसणाऱ्या संधी पाहून आता जगभरातील टेक कंपन्यांनी गुंतवणुकीस सुरुवात केली आहे. या नवीन इंडस्ट्रीमुळे नोकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहेत. या क्षेत्रातून नवीन रोजगार निर्मिती देखील वाढणार आहे. एकंदरीत एआय आता भारताचं भविष्य ठरवणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

काहीच दिवसांत देशाचा अर्थसंकल्प सादर केला जणार आहे. भारत सरकारने यावेळी देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरवर नेण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यामध्ये शेती, उत्पादन आणि सेवा अशा विवीध क्षेत्रांचा समावेश आहे. पण, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स भारताला १५ ट्रिलियन डॉलर्स म्हणजेच १५ लाख कोटी रुपयांच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतो. ग्लोबल कन्सल्टन्सी फर्म पीडब्लूसीचे मुख्य AI ऑफिसर जो ऍटकिन्सन यांनी एआयला चांगलं भविष्य असल्याचे सांगितले. ते म्हणाले, येत्या काळात एआय आधारित सूक्ष्म व्यवहार आणि वैयक्तिक सेवांना मागणी वाढणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

कोणत्या क्षेत्रात एआयची गरज?अशा परिस्थितीत पुरवठा साखळीत AI आधारित सेवांची नितांत गरज भासणार आहे. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. अनेक कंपन्या आता उत्पादकता वाढवण्यासाठी एआयची मदत घेत आहेत. मोठ्या कंपन्या ग्राहकांचे वर्तन समजून घेण्यासाठी आणि वाढीसाठी नवीन संधी शोधण्यासाठी AI वापरत आहेत. मीडियातही आता एआय अँकर बातम्या देऊ लागली आहे. चॅट जीपीटी, गुगल जेमिनी सारखे एआय टूल लोकप्रिय होत आहेत. 

एआय क्रांती आणणार?येत्या काळात पुरवठा साखळीपासून ते विक्रेता व्यवस्थापनापर्यंत सर्वच गोष्टींमध्ये एआयची गरज भासणार आहे. विशेषतः डेटाआधारीत कंपन्यांमध्ये एआयची मोठी मदत होणार आहे. पारंपरीक डेटा विश्लेषणापेक्षा एआय प्रचंड वेगवान आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा तयार केल्या जात आहेत. प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या मदतीने आता एआयकडून कामे करुन घेतली जातील. अधिक फायदेशीर व्यवसाय मॉडेलसाठी एआयची मोठी मदत होणार आहे. एआयमध्ये उत्पादन प्रणालीत क्रांती घडवून आणण्याची क्षमता आहे.

एआयमुळे नवीन संधी उपलब्ध होणारकृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर व्यवसाय क्षेत्रात वाढल्यानंतर त्याचा थेट परिणाम नोकऱ्यांवर होणार आहे. अनेक क्षेत्रात त्याचा विपरित परिणामही होऊ शकतो. मात्र, यातील तज्ज्ञ याला सकारात्मक पद्धतीने घेत आहेत. म्हणजे एआयच्या मदतीने नोकरी जाणार ऐवजी तुमची मदत होईल, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे समजा एखाद्या ग्राफीक्स डिझायनर एआयच्या मदतीने कमी वेळात चांगलं ग्राफीक्स तयार करू शकतो. यात त्याची नोकरी जाण्याची शक्यता कमीच आहे. कारण, ग्राफीक्स, त्याची रंगसंगती, रचना हे समजायला प्रशिक्षित आणि सृजनशील कलाकाराचीच गरज आहे. शिवाय येत्या काळात एआयमुळे आणखी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील यात शंका नाही.

टॅग्स :आर्टिफिशिअल इंटेलिजन्सनोकरीगुंतवणूकव्यवसाय