लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) बलाढ्य तंत्रज्ञान कंपनी गुगलमधील ३० हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. ‘द इन्फॉर्मेशन’ने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. त्यानुसार, गुगल आपल्या वापरासाठी सातत्याने एआय मॉडेल विकसित करीत आहे.
एक्स्टर्नल ॲप्लिकेशनसाठीच नव्हे, तर ऑपरेशनल स्ट्रक्चरसाठीही एआयचा वापर करण्यावर गुगलने भर दिला आहे. त्यामुळे कंपनीची मनुष्यबळाची गरज कमी होणार आहे. त्यातून तब्बल ३० हजार कर्मचाऱ्यांची नोकरी जाऊ शकते. कंपनीने नोकरकपातीची तयारी चालविली असल्याचेही सांगण्यात आले आहे.
गेल्या वर्षीही कुऱ्हाड
गेल्या वर्षी गुगलने १२ हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले होते. ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कर्मचारी कपात होती. आता पुन्हा व्यवसायाचे फेरव्यवस्थापन करण्याची गरज असल्याचे कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांचे मत आहे. त्यानुसार पुन्हा नोकरकपातीची तयारी केली जात आहे, असे सूत्रांनी सांगितले.