संतोष ठाकूर
नवी दिल्ली : आर्सेलर मित्तल, सेल व स्टील अॅथोरिटी आॅफ इंडिया, यांच्या संयुक्त भागीदारीतील प्रकल्प महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. केंद्रीय लोह व खनिजमंत्री चौधरी वीरेंद्र सिंह यांनी सांगितले की, या कंपनीला महाराष्ट्र, गुजरात व आंध्र प्रदेश या तीन राज्यांचे पर्याय देण्यात आले आहेत. पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था व व्यवसायाला योग्य या घटकांचा विचार करून कंपनी निर्णय घेणार आहे.
आर्सेलर मित्तल कंपनीचे प्रमुख लक्ष्मीनिवास मित्तल यांच्यासह सेलच्या अधिकाऱ्यांची अलीकडेच दिल्लीत बैठक झाली. त्या वेळी सरकारी अधिकारीही उपस्थित होते. या तिघांमध्ये संयुक्त कंपनी स्थापण्याबाबत अद्याप सामंजस्य करार मात्र झालेला नाही.
वीरेंद्र चौधरी यांनी सांगितले की, हा प्रकल्प १५ दशलक्ष टन क्षमतेचा असेल. पुढे ही क्षमता २५ दशलक्ष टनापर्यंत वाढविली जाईल. रेल्वेसाठी लोखंडाचा पुरवठा करण्यात आपण मागे पडत आहोत. तो वाढविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.