Join us

व्होडाफोन आयडिया कंपनीमधून बिर्ला बाहेर पडणार? शेअर बाजारात उमटले असे पडसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2021 10:45 AM

Vodafone Idea News: व्होडाफोन आयडिया लिमिटेडला (व्हीआयएल) आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आपली हिस्सेदारी कोणत्याही सरकारी अथवा अन्य देशांतर्गत वित्तीय संस्थेला देण्यास आपण तयार आहोत, असे कुमारमंगलम बिर्ला यांनी सरकारला कळविले आहे.

नवी दिल्ली : व्होडाफोनआयडिया लिमिटेडला (व्हीआयएल) आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आपली हिस्सेदारी कोणत्याही सरकारी अथवा अन्य देशांतर्गत वित्तीय संस्थेला देण्यास आपण तयार आहोत, असे कुमारमंगलम बिर्ला यांनी सरकारला कळविले आहे.बिर्ला हे व्हीआयएलचे प्रवर्तक आणि आदित्य बिर्ला समूहाचे चेअरमन आहेत. बिर्ला यांच्या या घोषणेनंतर मंगळवारी शेअर बाजारात कंपनीच्या समभागांची मोठी घसरण झाली आहे. दिवसभर हे समभाग खाली-खालीच येत होते.  गेल्या ७ जुलैला त्यांनी केंद्रीय कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांना एक पत्र पाठविले आहे. त्यात त्यांनी हा प्रस्ताव दिला आहे. प्राप्त माहितीनुसार, व्हीआयएलवर १.८ लाख कोटी रुपयांचे कर्ज असून त्यात स्पेक्ट्रमची थकीत रक्कम तसेच समायोजित सकळ महसुलाची देयता यांचा समावेश आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये २५ हजार कोटी रुपये उभे करण्याची योजना आखली होती. तथापि, कोणीही गुंतवणूकदार समोर न आल्यामुळे ती बारगळली. त्यामुळे आता बिर्ला यांनी सरकारला साकडे घातले आहे. बिर्ला यांनी पत्रात म्हटले की, व्हीआयएलशी जोडल्या गेलेल्या २७ कोटी भारतीयांचे हित लक्षात घेऊन मी कंपनीतील माझी हिस्सेदारी सार्वजनिक क्षेत्रातील, सरकारी अथवा देशांतर्गत वित्तीय संस्थेकडे हस्तांतरित करण्यास तयार आहे. व्हीआयएलमध्ये बिर्ला यांची २७ टक्के, तर व्होडाफोन पीएलसीची ४४ टक्के हिस्सेदारी आहे. कंपनीचे सध्याचे भांडवली मूल्य २४ हजार कोटी रुपये आहे. 

शेअर बाजारात नकारात्मक पडसादकुमारमंगलम बिर्ला यांच्या घोषणेचे शेअर बाजारामध्ये नकारात्मक परिणाम उमटले. मंगळवारी दिवसभर कंपनीच्या शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. त्यामुळे भावही खूपच कमी झाले. बाजारात केवळ विक्री करणारे असल्यामुळे या समभागाने आपला वर्षभरातील नीचांक (७.१५ रुपये) नोंदविला.

टॅग्स :व्होडाफोनआयडियाव्यवसाय