Join us  

कर्ज घेणे आणखी महागणार? रिझर्व्ह बँक बुधवारी रेपो दरात आणखी एक वाढ करण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2022 10:30 AM

RBI : बुधवारी होणाऱ्या आढाव्यातही रेपो दर किमान ०.३५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. येत्या काही महिन्यांत रेपो दरात आणखी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

मुंबई : सर्व प्रयत्न करूनही महागाई कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) बुधवारी आपल्या आगामी पतधोरण आढाव्यात पुन्हा एकदा रेपो दरात वाढ करण्याची शक्यता आहे. गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी यापूर्वीच तसे संकेत दिले असल्याने गृह, वाहन कर्जाचा ईएमआय आणखी वाढणार आहे. याचा नागरिकांना थेट फटका बसणार आहे.केंद्रीय बँकेने गेल्या महिन्यात कोणताही कार्यक्रम ठरलेला नसताना अचानक धक्का देत पतधोरण समितीच्या (एमपीसी) बैठकीत रेपो दरात ०.४० टक्क्यांनी वाढ केली होती. बुधवारी होणाऱ्या आढाव्यातही रेपो दर किमान ०.३५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. येत्या काही महिन्यांत रेपो दरात आणखी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.गव्हर्नर दास यांच्या अध्यक्षतेखाली एमपीसीची तीन दिवसीय बैठक सोमवारपासून सुरू होणार आहे. बुधवारी झालेल्या बैठकीत घेतलेले निर्णय गव्हर्नर जाहीर करतील.किरकोळ महागाईचा दर एप्रिलमध्ये सलग सातव्या महिन्यात वाढून ७.७९ टक्क्यांवर पोहोचला आहे. हा दर आठ वर्षांच्या उच्चांकावर आहे. युक्रेन-रशिया युद्धामुळे इंधनासह वस्तूंच्या किमतीत झालेली वाढ हे त्याचे प्रमुख कारण आहे.घाऊक किमतींवर आधारित महागाई १३ महिन्यांपासून दुहेरी अंकात राहिली आहे आणि एप्रिलमध्ये १५.०८ टक्क्यांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचली आहे. घाऊक किमतींचाथेट परिणाम किरकोळ महागाईवर होतो. त्यामुळे पुढील काही महिन्यांमध्ये किरकोळ महागाई आतापर्यंतचा नवा उच्चांक गाठण्याची भीती आहे.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकपैसा