Join us

डिसेंबरमध्येही कार-होम लोन स्वस्त होणार का? RBI गव्हर्नरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 3:03 PM

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी १८ ऑक्टोबर रोजी व्याजदरात कपातीबाबत मोठं वक्तव्य केलंय. जाणून घ्या काय म्हणालेत दास?

RBI Shaktikanta Das : गृहकर्ज (Home Loan) आणि कार लोन (Car Loan) स्वस्त होण्याची वाट पाहणाऱ्या लोकांची थोडी निराश होऊ शकते. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी १८ ऑक्टोबर रोजी व्याजदरात कपातीबाबत मोठं वक्तव्य केलंय. सध्या व्याजदर कमी करणं घाईचं आणि अतिशय जोखमीचं आहे, असं ते म्हणाले. त्यामुळे डिसेंबरमध्ये रेपो दरात कपात होण्याची आशा नाही. या महिन्याच्या सुरुवातीला आरबीआयने आपल्या पतधोरणात रेपो दरात कपात केली नव्हती.

डिसेंबरमध्ये व्याजदर कमी होण्याची शक्यता होती

आरबीआय डिसेंबरमध्ये आपल्या पतधोरणात समितीच्या बैठकीनंतर रेपो दरात कपात करू शकते, असं मानलं जात होतं. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची (एमपीसी) बैठक डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. एमपीसीची बैठक दर दोन महिन्यातून एकदा होते. परंतु, रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरच्या १८ ऑक्टोबरच्या वक्तव्यानंतर डिसेंबरमध्ये व्याजदरात घट होण्याची शक्यता धुसर झाली आहे.

दर का कमी केले गेले नाहीत?

आम्ही निर्णय घेण्यात आम्ही मागे नाही. भारताच्या विकासावर कोणताही परिणाम झालेला नाही. भारताचा विकास दर ७.२ टक्के राहील. विकास दर कायम आहे, महागाईही कमी होत आहे, तरीही काही धोके आहेत. त्यामुळे व्याजदरात कपात करणं घाईचं आणि जोखमीचे ठरेल. महागाई कमी होण्याची शक्यता आहे, पण त्याच्या दृष्टीकोनात काही मोठे धोके आहेत, असे दास मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले.

महागाई आटोक्यात आणण्यावर भर

रिझर्व्ह बँकेनं ऑक्टोबरच्या सुरुवातीला सादर केलेल्या पतधोरणात रेपो दरात बदल केला नसला, तरी पतधोरणाबाबतची भूमिका बदलली. त्यांनी आपली भूमिका बदलून 'विड्रॉल ऑफ अॅकॉमोडेशन' ऐवजी 'न्यूट्रल' अशी केली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी किरकोळ महागाई नियंत्रणात आणण्यावर आपला भर राहील, असं यापूर्वीच स्पष्ट केलं होतं.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकशक्तिकांत दास