नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओ चालू आर्थिक वर्षासाठीच्या व्याजदराबाबत येत्या २६ आॅगस्ट रोजी निर्णय घेण्याची शक्यता आहे. ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची २६ आॅगस्टला बैठक होणार असून यावेळी ५ कोटी सदस्यांच्या भविष्य निर्वाह निधी रकमेच्या व्याजदराबाबत निर्णय होईल.
केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या या बैठकीत २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी व्याज दर निर्धारणाचा मुद्दा अजेंड्यावर आहे. यापूर्वी विश्वस्त मंडळाची बैठक २१ आॅगस्ट रोजी होणार होती. ईपीएफओने २०१३-१४ या वर्षासाठी भविष्य निधी रकमेवर ८.७५ टक्के व्याजदराची घोषणा केली, तर गेल्या वर्षासाठी ८.५ टक्क्यांहून अधिक व्याजदर दिला.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, केंद्रातील नव्या सरकारने प्रतिमहिना वेतन मर्यादा ६,५०० रुपयांवरून वाढवून १५,००० रुपये केली आहे. त्यामुळे यंदा व्याजदर निर्धारण प्रक्रिया खूप गुंतागुंतीची झाली आहे. तथापि, केंद्र सरकारने यासंदर्भात अधिसूचना न काढल्याने नवी वेतन मर्यादा अद्याप लागू झाली नाही.
सध्या संघटित क्षेत्रामध्ये ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन निर्धारित मर्यादेत आहे, ते ईपीएफओच्या सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत येतात. (लोकमत न्यूज नेटवर्क)
भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदराचा निर्णय येत्या २६ आॅगस्टला होणार?
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओ चालू आर्थिक वर्षासाठीच्या व्याजदराबाबत येत्या २६ आॅगस्ट रोजी निर्णय घेण्याची शक्यता आहे
By admin | Published: August 11, 2014 02:05 AM2014-08-11T02:05:20+5:302014-08-11T02:05:20+5:30