वाॅशिंग्टन : साेशल मीडिया क्षेत्रातील आघाडीची कंपनी फेसबुकवर अमेरिकेत खटला दाखल केला असून, कंपनीचे विभाजन करण्याची शिफारस फेडरल ट्रेड कमिशनने केली आहे, तसेच झाल्यास संस्थापक मार्क झुकेरबर्गने उभारलेले फेसबुकचे साम्राज्यही उद्ध्वस्त हाेण्याची शक्यता आहे.
अमेरिकेच्या अँटी ट्रस्ट कायद्यांतर्गत हा खटला दाखल करण्यात आला आहे. फेसबुकवर अनुचित पद्धतीने प्रतिस्पर्धा राेखण्याचा प्रयत्न केल्याचा आराेप ठेवण्यात आला आहे. डिजिटल बाजारपेठेत कंपनीने वर्चस्वाचा दुरुपयाेग केला असून, या दशकात अनेक लहान कंपन्यांना विकत घेऊन साेशल मीडियामधून प्रतिस्पर्ध्यालाच संपविल्याचा आराेप करण्यात आला आहे. कंपनीने प्रचंड वापरकर्त्यांची माहिती गाेळा केली असून, हे धाेकादायक असल्याचे ट्रेड कमिशनने म्हटले आहे.
ट्रेड कमिशनने चार महिन्यांपूर्वी झुकेरबर्गची चाैकशीही केली हाेती. गेल्या वर्षी तर कंपनीला ३४ हजार काेटी रुपयांचा दंडही भरावा लागला हाेता. इन्स्टाग्राम आणि व्हाॅट्सॲपच्या माध्यमातून फेसबुकला प्रचंड उत्पन्न मिळत आहे.
फेसबुकने आराेप फेटाळले
फेसबुकने हे आराेप फेटाळताना म्हटले आहे की, वापरकर्ते तसेच अनेक लहान व्यापाऱ्यांना फेसबुकच्या सुविधा माेफत मिळतात. तसेच फेसबुकने खरेदी केल्यामुळे या दाेन्ही ॲपमध्ये प्रचंड सुधारणा झाल्या असून, जास्तीत जास्त लाेकांपर्यंत पाेहाेचल्याचा फायदाही झाला आहे, असे झुकेरबर्गने कर्मचाऱ्यांना उद्देशून लिहिलेल्या एका पाेस्टमध्ये म्हटले आहे.
गुगल, मायक्राेसाॅफ्टवरही खटले
यापूर्वी टेक जायंट कंपनी ‘गुगल’वर गेल्या वर्षी ऑक्टाेबरमध्ये अशाच पद्धतीचा खटला दाखल करण्यात आला हाेता, तर मायक्राेसाॅफ्टवरही १९९० मध्ये अशाच प्रकारच्या आराेपांवरून कंपनीचे विभाजन करण्यात आले हाेते. ‘ॲपल’ आणि ‘ॲमेझाॅन’ या कंपन्याही ट्रेड कमिशनच्या रडारवर आहेत.
इन्स्टाग्राम, व्हाॅट्सॲप होणार वेगळे? फेसबुकवर अमेरिकेत खटला; कंपनीच्या विभाजनाची शिफारस
Facebook News : साेशल मीडिया क्षेत्रातील आघाडीची कंपनी फेसबुकवर अमेरिकेत खटला दाखल केला असून, कंपनीचे विभाजन करण्याची शिफारस फेडरल ट्रेड कमिशनने केली आहे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 05:50 AM2020-12-12T05:50:52+5:302020-12-12T05:52:33+5:30