Join us

पहिल्याच दिवशी LIC देणार नफा? कंपनी लिस्टिंगकडे गुंतवणूकदारांच्या नजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 9:31 AM

भारतीय जीवन विमा महामंडळाच्या आयपीओला मोठा प्रतिसाद लाभल्यानंतर आता या कंपनीच्या लिस्टिंगकडे गुंतवणूकदारांच्या नजरा लागल्या आहेत.

प्रसाद गो. जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क 

भारतीय जीवन विमा महामंडळाच्या आयपीओला मोठा प्रतिसाद लाभल्यानंतर आता या कंपनीच्या लिस्टिंगकडे (दि. १७) गुंतवणूकदारांच्या नजरा लागल्या आहेत. यानंतर तरी बाजारामध्ये काहीशी तेजी येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. याशिवाय  महागाई, खनिज तेलाचे दर, युक्रेनचे युद्ध, कंपन्यांचे निकाल आणि कोरोना रुग्णांची संख्या या बाबींवरही बाजाराची वाटचाल अवलंबून राहणार आहे. 

गतसप्ताहामध्ये वाढलेले व्याजदर आणि महागाई या दोन बाबींमुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण झाली. भारतातही शेअर बाजार खाली आला आहे. 

विदेशी गुंतवणूकदारांनी काढले २५ हजार कोटी

भारतामधून भांडवल काढून घेणाऱ्या परकीय संस्थांकडून विक्री कायम आहे. मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात या संस्थांनी २५,२०० कोटी रुपयांची विक्री करून तेवढे भांडवल काढून घेतले आहे. गेल्या सात महिन्यांपासून या संस्थांची विक्री सुरूच असून, या काळात त्यांनी १.६५ लाख कोटी रुपये भारतीय बाजारातून काढून घेतले आहेत. 

कंपन्यांचे भांडवल घटले

बाजारात मोठी घसरण झाल्यामुळे बाजार भांडवल मूल्यामध्येही घट झाली आहे. सप्ताहामध्ये गुंतवणूकदारांचे १३,८३६३७.९६ कोटी रुपयांचे भांडवल वाहून गेले आहे. महागाई, गुंतवणूकदारांकडून होत असलेली विक्री आणि जगभरातील शेअर बाजारांमध्ये असलेली मंदी यांमुळे बाजार खाली येत आहे. 

टॅग्स :एलआयसीएलआयसी आयपीओशेअर बाजार