Join us

जूनपासून कर्जे महागणार?; महागाई रोखण्यासाठी RBI करू शकते व्याजदरात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 10:28 AM

रेपो दरामध्ये मे, २०२० पासून कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कोरोनाचा फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी आणि लोकांना स्वस्त कर्ज उपलब्ध होण्यासाठी बँकेने व्याजदर निचांकी पातळीवर स्थिर ठेवले आहेत.

नवी दिल्ली : स्वस्त कर्ज घेण्याची संधी आता पुढील एक-दोन महिनेच राहणार आहे. महागाई नियंत्रणात येत नसल्याने, रिझर्व्ह बँक ॲाफ इंडियावर दबाव वाढला असून, बँक पुढील एक-दोन महिन्यांत कठोर पावले उचलण्याचे संकेत आहेत. रिझर्व्ह बँक जूनच्या बैठकीत व्याजदरात वाढ करण्याची घोषणा करू शकते, असा अंदाज संशोधन संस्था  नोमुराने व्यक्त केला आहे. आरबीआयने व्याजदरात वाढ केल्यास कर्जे महाग होणार असून, ईएमआयमध्ये वाढ होणार आहे.

रेपो दरामध्ये मे, २०२० पासून कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कोरोनाचा फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी आणि लोकांना स्वस्त कर्ज उपलब्ध होण्यासाठी बँकेने व्याजदर निचांकी पातळीवर स्थिर ठेवले आहेत. चलनवाढीचा वाढलेला दर आणि महागाईला रोखण्यासाठी येत असलेले अपयश याला रोखण्यासाठी आरबीआय जून महिन्यापासून हळूहळू व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात करेल, असे अर्थतज्ज्ञांनी म्हटले आहे.

रिझर्व्ह बँक अर्थव्यवस्था वाढीसाठी पैशांचा प्रवास वाढविण्याचे प्रयत्न आता थांबविताना दिसून येईल. अशा स्थितीमध्ये जूनच्या बैठकीत रेपो दरात ०.२५ टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे, तसेच ऑगस्ट किंवा ऑक्टोबरच्या बैठकीत ०.५० टक्क्यांची वाढ होण्याचा अंदाच नोमुराने व्यक्त केला आहे.

महागाईचा फटका सुरूच

घाऊक किमतीवर आधारित महागाई मार्चमध्ये चार महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर १४.५५ टक्क्यांवर पोहोचली आहे. महागाईमधील ही वाढ प्रामुख्याने कच्चे तेल आणि वस्तूंच्या किमती वाढल्याने आली आहे, तर या दरम्यान भाज्यांचे दर मात्र कमी झाले आहेत. महागाई वाढल्याने अमेरिकेच्या मध्यवर्ती फेडरल रिझर्व्ह बँक ५० बेसिस दराने व्याजदरात वाढ करण्याची शक्यता आहे.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँक