Join us  

Silver Hallmarks: चांदीच्या दागिन्यांमधील लुबाडणूक आता थांबणार? शुद्धतेच्या खात्रीसाठी हॉलमार्क बंधनकारक करण्याच्या हालचाली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 7:22 AM

Silver Hallmarks: या उद्योगाशी संबंधित सर्वांना यासाठी बोलावले आहे. लवकरच देशात चांदीच्या दागिन्यांना हॉलमार्क बंधनकारक केले जाईल अशी अपेक्षा आहे. चांदीवर हॉलमार्कची अमलबजावणी नेमक्या कशा पद्धतीने करता येईल यावर बैठकीत चर्चा होणार आहे.

नवी दिल्ली :चांदीच्या दागिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात इतर धातू मिसळले जात असतात. ग्राहकांना दर मात्र शुद्ध चांदीचा आकारला जात असतो. ही फसवणूक थांबावी यासाठी सोन्याप्रमाणे चांदीच्या दागिन्यांवर हॉलमार्क बंधनकारक करावे अशी मागणी आता ग्राहक करू लागले आहेत. भारतीय मानक ब्युरोने आता याबाबत पुढाकार घेतला आहे. २२ जानेवारी रोजी ब्युरोने चांदीच्या दागिन्यांवर हॉलमार्क बंधनकारक करण्याबाबत विचारविनिमय करण्यासाठी बैठक बोलविली आहे.

या उद्योगाशी संबंधित सर्वांना यासाठी बोलावले आहे. लवकरच देशात चांदीच्या दागिन्यांना हॉलमार्क बंधनकारक केले जाईल अशी अपेक्षा आहे. चांदीवर हॉलमार्कची अमलबजावणी नेमक्या कशा पद्धतीने करता येईल यावर बैठकीत चर्चा होणार आहे.

अशुद्ध सोन्याच्या तक्रारी कमी झाल्या

शुद्ध स्वरूपातील सोन्याचे दागिने मिळावे यासाठी तीन वर्षांपूर्वी १६ जून २०२१ रोजी दागिन्यांवर हॉलमार्क बंधनकारक केले. दागिन्यांवर एचयूआयडी दिला जातो. त्यात दागिन्यांचा निर्माता आणि हॉलमार्क केंद्राची माहिती असते. यामुळे दागिन्यांच्या शुद्धतेबाबत तक्रारी खूप कमी झाल्या आहेत.

चांदीच्या शुद्धतेची खात्री देणारी व्यवस्थाच नाही

सध्या देशात चांदीच्या दागिन्यांच्या शुद्धतेची खात्री देता यावी यासाठी कसलीही व्यवस्थाच नाही. याबाबत कोणतीही मानके निश्चित नाहीत.

चांदीचे बहुतांश दागिने ४०, ४५ ते ५० टक्के गुणवत्तेचे बनवले जातात. त्यात इतर धातूंचे मिश्रण केले जाते.

६५ ते ८० टक्के गुणवत्तेचे दागिने चांगले मानले जातात. परंतु, असे दागिने फारच कमी प्रमाणात बनतात. 

चांदीच्या बांगड्या, अंगठ्या मोठ्या प्रमाणात लोक करीत असतात. सर्वाधिक प्रमाणावर बनविल्या जाणाऱ्या चांदीच्या पैंजणात मिश्रणाचे प्रमाण सर्वाधिक आहे.

दागिन्यांचे पैसे घेताना ग्राहकांकडून शुद्ध चांदीच्या दराने पैसे घेतले जातात. मात्र, त्यात निम्म्यापेक्षा अधिक इतर धातू मिसळलेले असतात. सध्या चांदीचा दर प्रतिकिलो ९० हजार रुपये इतका आहे.

टॅग्स :चांदी