Join us  

११ हजार कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर META मधून आता मार्क झुकरबर्गही राजीनामा देणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 3:08 PM

मेटा कंपनीचे गुंतवणुकदारही मार्क झुकरबर्ग यांच्यावर भरवसा ठेवत नाहीत. त्यामुळे मेटामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दुपट्टीने कमी झालीय.

अलीकडेच META सीईओ मार्क झुकरबर्गनं कंपनीतून ११ हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढलं. या नोकर कपातीवरून मार्कनं माफीही मागितली आहे. मात्र आता खुद्द मार्क झुकरबर्गही राजीनामा देणार असल्याची बातमी समोर आली आहे. रिपोर्टनुसार २०२३ मध्ये मार्क झुकरबर्ग राजीनामा देऊ शकतात. वारंवार अयशस्वी होणाऱ्या कंपनीच्या प्रोजेक्टनंतर मोठ्या बदलाची तयारी सुरू आहे. परंतु मार्कच्या राजीनाम्याची बातमी मेटा प्रवक्त्यांनी फेटाळून लावलीय. 

द लीक नावाच्या वेबसाईटनं त्यांच्या रिपोर्टमध्ये मार्क झुकरबर्ग कंपनी सोडणार असल्याचा दावा करण्यात आला. रिपोर्टमध्ये म्हटलंय की, मार्क झुकरबर्गनं मेटावर्स प्रोजेक्टवर पाण्यासारखा पैसा खर्च केला. परंतु काहीच रिझल्ट आला नाही. त्याशिवाय कंपनीला सातत्याने नुकसान सहन करावं लागत आहे. मार्क झुकरबर्ग यांच्या VR प्रोजेक्टलाही बाजारात फारसा प्रतिसाद मिळाला नाही असं सांगण्यात आले आहे. 

मेटा कंपनीचे गुंतवणुकदारही मार्क झुकरबर्ग यांच्यावर भरवसा ठेवत नाहीत. त्यामुळे मेटामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दुपट्टीने कमी झालीय. हे सर्व ब्रॅड गेर्स्टनरच्या ओपन लेटरनंतर समोर आले आहे असं फायनॅन्शियल टाइम्सच्या रिपोर्टमध्ये गेल्या महिन्यात म्हटलंय. मेटावर्स सारखा प्रोजेक्ट अयशस्वी ठरला आणि गुंतवणूकदार कमी झाले त्याला मार्क झुकरबर्ग जबाबदार असल्याचं सांगण्यात येत आहे. मेटावर्समुळे मेटाचा स्टॉक ७० टक्क्यांहून अधिक कोसळला आहे. परंतु रिपोर्टमध्ये हेदेखील स्पष्ट केले आहे की, मार्क झुकरबर्गचा राजीनामा निव्वळ पीआर स्टंट असू शकतो. मेटा कम्युनिकेशन हेड एंडी स्टोन यांनी झुकरबर्गच्या राजीनाम्याची अफवा असल्याचं सांगितले आहे. 

११ हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळउत्पन्नात घट झाल्यामुळे 'मेटा'ने कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला. META चे चीफ एक्झिक्युटिव्ह मार्क झुकरबर्ग यांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं होतं, "मी META च्या इतिहासात घेतलेले काही सर्वात कठीण निर्णय शेअर करत आहे. मी माझी टीम सुमारे १३ टक्क्यांनी कमी करण्याचा आणि ११ हजारांहून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही पूर्वीपेक्षा चांगली आणि सक्षम कंपनी बनण्यासाठी, अतिरिक्त खर्चात कपात करत आहोत आणि भरतीवरील बंदी तात्काळ वाढवण्यासाठी काही कठोर निर्णय घेत आहोत असं त्यांनी सांगितले होते. 

टॅग्स :मेटाफेसबुकमार्क झुकेरबर्ग