Join us

बाजार मारणार का मुसंडीचा षटकार ?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 1:16 PM

शेअर बाजाराने सलग चौथ्या सप्ताहात वाढीचा आलेख कायम राखला असून आता पुढील दोन आठवडे बाजार वाढत राहून षटकार मारणार का, याची गुंतवणूकदारांना प्रतीक्षा आहे.

- प्रसाद गो. जोशीशेअर बाजाराने सलग चौथ्या सप्ताहात वाढीचा आलेख कायम राखला असून आता पुढील दोन आठवडे बाजार वाढत राहून षटकार मारणार का, याची गुंतवणूकदारांना प्रतीक्षा आहे. आगामी सप्ताहात जाहीर होणारे एक्झिट पोलचे निकाल तसेच भारत आणि अमेरिकेचा जीडीपी, पी एम आय, वाहन विक्रीचे आकडे याच्यावरही बाजाराची वाटचाल अवलंबून आहे. या सप्ताहात एफ अँड ओ व्यवहारांची सौदापूर्ती असल्याने बाजार काहीसा अस्थिर राहण्याची शक्यता आहे.

गतसप्ताहात शेअर बाजारामध्ये वातावरण सकारात्मक राहिले. बाजाराचा संवेदनशील निर्देशांक (सेन्सेक्स) ७५.३१अंशांनी वाढून  ६५,९७०.०४ अंशावर पोहोचला. निफ्टी १९७९४.७० अंशावर पोहोचला असून गतसप्ताहात त्यामध्ये ६२.९०अंशांची वाढ झाली आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांची वाढ काही प्रमाणात कमी झाली असली तरीही या निर्देशांकांनी गतसप्ताहात २२९.७७ आणि २०८.६६ अंशांनी वाढ दाखविली आहे.

पाच राज्यांमधील विधानसभेचे मतदान संपल्यावर जाहीर होत असलेली एक्झिट पोलची आकडेवारी ही बाजार काही प्रमाणात वर खाली करू शकते. त्याचप्रमाणे या सप्ताहात भारत आणि अमेरिकेच्या तिमाही जीडीपीची आकडेवारीही जाहीर होणार आहे. जीडीपीमध्ये वाढ होण्याची अपेक्षा असली तरी जर काही कमी जास्त झाले तर बाजारावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. 

आयपीओ बाजार चांगलाच गजबजला - गतसप्ताहात आयपीओ बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात उलाढाल झालेली दिसून आली. एकूण पाच कंपन्यांचे आयपीओ बाजारात आले होते, त्यापैकी टाटा टेक्नॉलॉजी च्या आयपीओला प्रचंड प्रतिसाद लागल्याचे दिसून आले. - हा इश्यू सुमारे ७० पट अधिक सबस्क्राईब झाला. या पाच कंपन्यांमध्ये गुंतवणूकदारांनी सुमारे अडीच लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. अनेक दिवसांनंतर आयपीओसाठी गुंतवणूकदारांनी गर्दी केलेली दिसून आली.

टॅग्स :शेअर बाजार