नवी दिल्ली : सोन्याच्या दागिन्यांवर लावण्यात आलेला एक टक्का अबकारी कर मागे घेण्याची शक्यता अर्थमंत्री अरुण जेटील यांनी गुरुवारी लोकसभेत फेटाळून लावली. त्याचबरोबर, यंदा भाकीत केल्याप्रमाणे पाऊस चांगला झाल्यास भारताचा वृद्धिदर आणखी वाढेल, असे त्यांनी सांगितले.सोन्याच्या दागिन्यांवरील अबकारी कर मागे घेण्याची मागणी सरकारमध्ये सामील असलेल्या शिवसेनेने केली होती. अर्थमंत्री म्हणाले की, हा कर द्यावाच लागेल. मात्र, संबंधित व्यावसायिकांचा छळ होणार नाही, याची मी खात्री देतो.वित्त विधेयक-२०१६ वर झालेल्या चर्चेला उत्तर देताना जेटली बोलत होते. हे विधेयक त्यांच्या उत्तरानंतर सभागृहाने संमत केले. २८ फेब्रुवारी रोजी मांडलेल्या वित्त विधेयकात त्यांनी या वेळी काही दुरुस्त्या केल्या. छोट्या करदात्यांना मदत करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा त्यांनी या वेळी उल्लेख केला. काळ्या पैशाबाबत जेटली म्हणाले की, ‘सरकारच्या प्रयत्नामुळे ७१ हजार कोटी रुपयांचा काळा पैसा उघडकीस आला आहे. हे विधेयक या अधिवेशनातील महत्त्वाचा भाग होता. तेच सभागृहाने आवाजी मतदानाने मंजूर केले. जागतिक आर्थिक परिदृश्य चिंताजनक असले, तरीही भारतही वेगाने वृद्धी करणारी एक अर्थव्यवस्था आहे. हा वेग आणखी वाढविण्याची आमची क्षमता आहे. पनामा पेपर्सबाबत बोलताना ते म्हणाले की, या प्रकरणात ज्यांची नावे आली आहेत आणि ज्यांची परदेशात खाती आहेत, अशा सर्वांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. या आणि अन्य सर्वच मुद्यांचा त्यांनी यावेळी उल्लेख केला.कृषी उत्पन्न करपात्र नाही-कृषी उत्पन्न करपात्र करण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. कृषीद्वारे मोठे उत्पन्न मिळविणारे शेतकरी तुरळक आहेत. कृषीच्या नावाखाली उत्पन्न दडवणाऱ्यांना कर अधिकारी हाताळतील. -यंदा चांगल्या पावसाचे भाकीत करण्यात आले आहे. ते खरे ठरल्यास भारताचा विकास आणखी वेगाने होईल.
दागिन्यांवरील अबकारी कर मागे घेणार नाही - जेटली
By admin | Published: May 06, 2016 2:40 AM