नवी दिल्ली :
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा भारताला मोठा फायदा झाला आहे. रशियाकडून भारतास अगदी स्वस्तात म्हणजेच एक चतुर्थांश किमतीत कच्चे तेल मिळत आहे. असे असले तरी भारतात पेट्रोल-डिझेल स्वस्त झालेले नाही. परंतु, गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील निवडणुकांच्या रणधुमाळीत पेट्राेल आणि डिझेलच्या दरकपातीची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
भारताने २०२१-२२च्या तुलनेत ३८६ टक्के अधिक कच्चे तेल २०२२-२३ या वर्षाच्या पहिल्या ६ महिन्यांतच खरेदी केले आहे. कंपन्यांचा वाढता नफा लक्षात घेता पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रति लिटर २ रुपये कपात केली जाऊ शकते. ऑक्टोबरमध्ये इराकला मागे टाकून रशिया भारताचा सर्वांत मोठा तेल पुरवठादार बनला आहे. अमेरिका व युरोपियन देश रशियाच्या तेलाच्या किमती निश्चित करणार आहे. याचा भारताला आणखी लाभ होईल, असा दावा अमेरिकेने केला आहे.
इराककडूनही मिळू लागले स्वस्तात तेलरशियाने पाव किमतीत कच्चे तेल भारताला दिल्यामुळे भारताचा सर्वांत मोठा पुरवठादार म्हणून असलेल्या इराकच्या स्थानास धक्का बसला. त्यामुळे इराकनेही भारतासाठी तेलाच्या किमती घटविल्या आहेत. इराक रशियापेक्षा ९ डॉलरने कमी दरात कच्चे तेल देत आहे.
₹२१००० कोटी रुपयांचा तोटा तेल कंपन्यांना गेल्या सहामाहीमध्ये झाला होता. रशियाकडून मिळणाऱ्या स्वस्त तेलामुळे तो भरून निघत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे तेल कंपन्यांकडून दर कपात होण्याची शक्यता आहे.
₹२ प्रति लिटर होऊ शकते कपात, ₹६ सध्या कंपन्यांना पेट्रोल विक्रीवर प्रतिलिटर रुपयांचा नफानागरिकांना फायदा- गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाल्यामुळे सरकारकडून पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात केली जाण्याची शक्यता आहे. - भारतात शेवटची इंधन दर कपात २२ मे रोजी झाली होती तेव्हा सरकारने उत्पादन शुल्कात कपात केली होती. तेल कंपन्यांनी मात्र दरांत कपात केलेली नव्हती. - सध्या कंपन्यांना पेट्रोल विक्रीवर प्रतिलिटर ६ रुपयांचा नफा मिळत आहे. त्यामुळे दर कपातीला वावही आहे.